योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा..!

By Admin | Updated: May 10, 2017 00:47 IST2017-05-10T00:46:42+5:302017-05-10T00:47:33+5:30

जालना : विविध कल्याणकारी योजनांची माहिती समाजातील वंचित शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी मंगळवारी येथे केले.

Extend the plan to the last element ..! | योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा..!

योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा..!

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विविध कल्याणकारी योजनांची माहिती समाजातील वंचित शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी मंगळवारी येथे केले.
जालना शहरात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. राज्य शासनाने मनरेगाअंतर्गत स्वतंत्रपणे समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजना सुरु केली आहे. या ११ कलमी कार्यक्रमातंर्गत मागेल त्याला शेततळे, वृक्षारोपण, जलयुक्त शिवार अभियान, सिंचन विहीर, शौचालये, शोषखड्डे, फळबागा, स्वच्छ भारत मिशन,
घरकुल योजना, राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान, सातबारा संगणकीकरण, ईपॉस मशिन व ईपीडीएस, कर्ज पुनर्गठण आदी वैयक्तिक लाभाचे उपक्रम हाती घेतले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जालना येथील श्री वर्धमान स्थानकवासी श्रवक संघाच्या गुरु गणेश सभामंडपात मराठवाडा विकासात्मक विविध कार्यक्रम स्वरुपात राबवण्याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी उपस्थित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक व संबंधित यंत्रणेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, विभागीय अप्पर आयुक्त विजयकुमार फड, उपायुक्त पुरवठा वर्षा ठाकूर, उपायुक्त पुनर्वसन मनोहर हरपाळकर, अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश खपले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संदीप पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ. भापकर म्हणाले की, जालना जिल्हा देशपातळीवर बी-बियाणे उत्पादनात प्रथम क्रमांकावर असून, सीड हब म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. स्टिल उत्पादनातही हा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आपणास आता मागे राहायचे नाही. काही कारणाने मराठवाडा प्रदेश मानवविकास
निर्देशांकांत मागे आहे. आता या पुढे शिक्षण, पाणी, शेती, स्वरोजगार, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, वृक्ष लागवड, स्वच्छता अभियान, आरोग्याचे कार्यक्रम राबविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यात अधिकारी व पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था यांचा मोलाचा वाटा महत्वाचा आहे. आपल्याकडे सामर्थ्य आहे पण ते ओळखले पाहिजे जे चांगले काम करतात त्यांचा सन्मान करणे आवश्यक आहे. मनरेगाअंतर्गत मजुरांना काम देताना त्यांना मजूर म्हणून संबोधण्या ऐवजी लाभार्थी म्हणून त्यांचा या पुढे उल्लेख करावा.
यावेळी एलसीडी प्रोजेक्टद्वारे ग्रामस्वच्छता अभियान, पुरवठा विभाग ईपॉस प्रणाली, जलयुक्त शिवार, या बाबतचे सादरीकरण सहाय्यक आयुक्त चौधर, पुरवठा विभागाच्या उपायुक्त वर्षा ठाकूर, जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर यांनी केले तर आभार प्रदर्शन उपजिल्हाधिकारी संदीप पाटील यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, तसेच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: Extend the plan to the last element ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.