प्रवास दरात वाढ न होण्याची अपेक्षा
By Admin | Updated: June 3, 2014 01:08 IST2014-06-03T00:55:57+5:302014-06-03T01:08:32+5:30
औरंगाबाद : दिवसेंदिवस वाढत जाणार्या महागाईच्या वणव्यात सर्वसामान्यांवर आर्थिक बोजा पडत आहे

प्रवास दरात वाढ न होण्याची अपेक्षा
औरंगाबाद : दिवसेंदिवस वाढत जाणार्या महागाईच्या वणव्यात सर्वसामान्यांवर आर्थिक बोजा पडत आहे. त्यामध्ये भर म्हणून आता रेल्वे प्रवास महाग होऊ नये. त्यामुळे आगामी काळात रेल्वेच्या दरात कोणत्याही प्रकारे वाढ न होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. रेल्वेच्या विकासासाठी आणि खात्याच्या सक्षमीकरणासाठी प्रवास दरवाढ अनिवार्य असल्याचे सांगत लवकरच रेल्वे प्रवास दरात वाढ होणार असल्याचे संकेत रेल्वेमंत्र्यांनी नुकतेच दिले आहेत. जुलै महिन्यात अंतरिम रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. पर्यटनाची राजधानी म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहराच्या मॉडेल रेल्वेस्थानकावर सुरक्षा व्यवस्था, सोयी-सुविधांमध्ये वाढ करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे; परंतु रेल्वेमंत्र्यांच्या संकेतानंतर प्रवाशांची मुख्य अपेक्षा आहे ती प्रवासभाड्यात वाढ न होण्याची. औरंगाबाद रेल्वेस्थानकाहून दररोज हजारो प्रवासी ये- जा करतात. तसेच जालना, लासूरसह विविध ठिकाणांहून नोकरी, शिक्षणानिमित्त अनेक जण अप-डाऊन करतात. त्यामुळे रोजचा प्रवास महागल्यास आर्थिक घडी बसविणे अवघड होईल. म्हणून सध्यातरी रेल्वेच्या प्रवास दरात वाढ न होण्याची अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. रेल्वेने प्रवाशांची संख्या आणि असुविधा लक्षात घेऊन प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी सोयी-सुविधांमध्ये वाढ करण्याची गरज आहे. सुविधा उपलब्ध व्हाव्या रेल्वेच्या तिजोरीत पैसे नाहीत. सोयी-सुविधांअभावी प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रेल्वेने दरवाढ के ली, तर त्याबरोबर सोयी-सुविधाही दिल्या पाहिजे; परंतु केवळ दरवाढ करायची आणि सुविधा देण्याकडे दुर्लक्ष करायचे, असे होता कामा नये. सोयी-सुविधा देऊ शकत नसेल तर दरवाढ करण्याची आवश्यकता नाही. -ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती तर दरवाढ मान्य नाही सुविधा मिळणार असेल तर प्रवासी दरवाढ मान्य करतील; परंतु केवळ दरवाढ होणार असेल आणि सुविधा मिळणार नसतील, तर दरवाढ मान्य राहणार नाही. सोयी-सुविधांबरोबर तिकीट विक्रीच्या प्रमाणात रेल्वेगाड्यांना जनरल बोगींची संख्या वाढविण्याची गरज आहे. गाड्यांचे वेळापत्रक प्रवाशांच्या अनुषंगाने हवे. संतोषकुमार सोमाणी, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे प्रवासी सेना रेल्वे प्रवास दरात वाढ झाल्यास महिन्याकाठी अधिक आर्थिक फटका सहन करावा लागेल. रेल्वे प्रवासादरम्यान अनेक सोयी-सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे दरवाढ होता कामा नये. दरवाढ झाली तर प्राधान्याने सोयी-सुविधांमध्येही वाढ केली पाहिजे. -विजय नरवडे, प्रवासी दर घटण्याची अपेक्षा रेल्वेच्या प्रवास दरात घट होण्याची अपेक्षा होती. मात्र, दरवाढीचे संकेत मिळत आहेत. नोकरीनिमित्त दररोज अप-डाऊन करावे लागते. त्यामुळे महिन्याकाठी पैसे खर्च होतात. दरवाढ झाल्यास महिन्याचे बजेट बिघडेल. दररोज ये-जा करणे आवश्यक असल्याने आर्थिक झळ सहन करावी लागेल. रेल्वेच्या समस्या दूर करण्यास आधी प्राधान्य दिले पाहिजे. -मनोज ठोकळ, प्रवासी