खळबळजनक ! औरंगाबादेत विहिरीत आढळला मृतावस्थेत बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 16:16 IST2022-02-10T16:14:31+5:302022-02-10T16:16:14+5:30
बिबट्या शिकारीच्या शोधात आल्यानंतर चुकून विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज आहे.

खळबळजनक ! औरंगाबादेत विहिरीत आढळला मृतावस्थेत बिबट्या
औरंगाबाद : शहरातील चिकलठाणा परिसरातील एका विहिरीत बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चौधरी कॉलनी परिसरातील महादेव मंदिराजवळील विहिरीत बिबट्या मृतावस्थेत आढळला आहे.
चौधरी कॉलनी परिसरातील महादेव मंदिराजवळ एक विहिर आहे. या परिसराच्या बाजूला शेती असून विरळ वस्ती आहे. हा परिसरात भाविकांचे येणेजाणे असते. आज दुपारी काही भाविक महादेव मंदिरात दर्शनासाठी आले होते. भाविकांनी उत्सुकते पोटी जवळच्या विहिरीत पाहिले असता मृतावस्थेतील बिबट्या तरंगताना आढळून आला. त्यांनी लागलीच सर्पमित्र संघानंद शिंदे यांना संपर्क करून माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार हा बिबट्या दीड ते दोन वर्ष वयाचा असेल. तसेच एक दिवसांपूर्वी हा बिबट्या विहिरीत पडला असावा.
चार वर्षांपूर्वीही शहरात आढळला होता बिबट्या
बिबट्या शिकारीच्या शोधात आल्यानंतर चुकून विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज आहे. चौधरी कॉलनी परिसर शहराच्या जवळचा भाग असून येथे बिबट्याचा वावर होत असल्याचे या घटनेने पुढे आल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. चार वर्षांपूर्वी एक बिबट्या सिडको एन- १ परिसरातील नागरी वस्तीत शिरल्याने खळबळ उडाली होती. तेव्हा वन विभागाने बिबट्यास अथक प्रयत्नातून जेरबंद केले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा शहरात बिबट्याचा वावर आढळून आला.