प्रत्येकाने गती ओळखून कार्यसिद्ध व्हावे
By Admin | Updated: January 21, 2015 01:07 IST2015-01-21T00:56:14+5:302015-01-21T01:07:36+5:30
जालना : जगात प्रत्येकाची गती वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाने आपली गती ओळखून कार्यसिद्ध व्हावे, असा संदेश प.पु. विवेकमुनीजी म.सा. यांनी आपल्या आशीर्वादपर प्रवचनातून दिला.

प्रत्येकाने गती ओळखून कार्यसिद्ध व्हावे
जालना : जगात प्रत्येकाची गती वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाने आपली गती ओळखून कार्यसिद्ध व्हावे, असा संदेश प.पु. विवेकमुनीजी म.सा. यांनी आपल्या आशीर्वादपर प्रवचनातून दिला.
जैन समाजाचे आराध्य दैवत प.पु. गुरू गणेशलालजी म.सा. यांच्या ५३ व्या पुण्यतिथी महोत्सवात ते मार्गदर्शन करीत होते. गुरू गणेशलालजी म.सा. यांचे समाधीस्थळ असलेल्या येथील तपोधामवर दर्शनासाठी देशभरातून आलेल्या हजारो भाविकांनी आज दिवसभर गर्दी केली होती.
यावेळी झालेल्या गुरू गुणगान सभेत महाराष्ट्र उपप्रवर्तक प.पु. श्रुतमुनीजी म.सा., मौनसाधक प.पु. सौरवमुनीजी म.सा., मधुरव्याख्यानी प.पु. गौरवमुनीजी म.सा., प.पु. नरेशमुनीजी म.सा., प्रखरवक्ता प.पु. सुशीलकंवरजी म.सा., प.पु. शालीभद्रजी म.सा., प.पु. जयश्रीजी म.सा. आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
विवेकमुनीजी पुढे म्हणाले, गुरूदेव यांच्यात ज्ञानाचा अहंकार कधीच नव्हता. त्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होत गेले. दिवसेंदिवस या तपोधामवर वाढणारी भाविकांची संख्या हे त्याचेच द्योतक आहे. मनुष्याची अहंकारी प्रवृत्ती वाईट असते. ती माणसे जोडण्याऐवजी तोडण्याचेच काम करते. त्यामुळे मनुष्याने नेहमी अहंकारापासून दूर रहावे, असे आवाहनही विवेकमुनीजी यांनी केले.
श्रुतमुनीजी म.सा. म्हणाले, गुरूविना जीवन नाही. जीवनात गुरू शिष्यांना दिव्यासारखे मार्ग दाखवतात. त्यामुळे गुरू साधकाला आवश्यक असतो. पु. गणेशलालजी म.सा. यांच्या पश्चात त्यांनी अनुभूती श्रावकाला होते, असे त्यांनी सांगितले. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुदेशकुमार सकलेचा यांनी अध्यक्षीय समारोप करताना श्रावक संघामार्फत चालणाऱ्या विविध उपक्रमामध्ये समाजाच्या प्रत्येक घटकाने सहभाग घेतल्याने सर्वजण एकत्र जोडल्या गेले, असे सांगितले.
यावेळी पुण्यतिथी महोत्सवासाठी विविध ठिकाणांहून पदयात्रेद्वारे आलेल्या १० पदयात्रा प्रमुखांचा संतमुनींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रकाश बोथरा (वैजापुर), परमेष्ठी गु्रप (औरंगाबाद), सुरेशचंद ललवाणी (जामनेर), अजित ओस्तवाल (सिल्लोड), जवाहरमल बोरा (बीड), कोमलचंद बेदमुथा (लोणार), सुदर्शन नहाटा (पारगाव) आदींचा समावेश होता. ‘अमृत का आस्वाद’ या पुस्तकाचे विमोचन यावेळी करण्यात आले.
आ. सुभाष झांबड, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हा निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेश जोशी आदींनी तपोधामवर समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी ज्ञानप्रकाश योजना जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजू दर्डा, उपाध्यक्षा रुचिरा सुराणा, डॉ. धमरचंद गादिया, स्वरुपचंद ललवाणी, कचरूलाल कुंकुलोळ, आनंदकुमार सुराणा, विजयराज सुराणा, भरतकुमार गादिया, संजय मुथा, डॉ. गौतमचंद रुणवाल, नरेंद्र लुणिया, डॉ. कांतीलाल मांडोत, सुरजमल मुथा आदींची उपस्थिती होती.
आज दिवसभर गणेश भवन परिसरात भाविकांची गर्दी होती. भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)