एक विद्यार्थी आला तरी तासिका घ्या; कुलगुरु विजय फुलारी यांची प्राचार्यांना तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:54 IST2025-06-18T19:54:04+5:302025-06-18T19:54:09+5:30

प्राचार्यांनी प्रत्येक महिन्यास विद्यार्थ्यांच्या हजेरीचा अहवाल विद्यापीठाकडे पाठविणे बंधनकारक असेल.

Even if one student comes, take a lesson; Vice Chancellor Vijay Phulari warns principals | एक विद्यार्थी आला तरी तासिका घ्या; कुलगुरु विजय फुलारी यांची प्राचार्यांना तंबी

एक विद्यार्थी आला तरी तासिका घ्या; कुलगुरु विजय फुलारी यांची प्राचार्यांना तंबी

छत्रपती संभाजीनगर : महाविद्यालयात नियमित तासिका होतात की नाही याची पाहणी करण्यासाठी ‘सरप्राइज व्हिजिट’ देण्यात येतील. त्यामुळे एक जरी विद्यार्थी आला तरी तासिका घेतलीच पाहिजे. प्राचार्यांनी प्रत्येक महिन्यास विद्यार्थ्यांच्या हजेरीचा अहवाल विद्यापीठाकडे पाठविणे बंधनकारक असेल. या नियमांचे पालन न करणाऱ्या प्राचार्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी तंबी कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांनी प्राचार्यांच्या बैठकीत दिली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील नवीन शैक्षणिक वर्षाला सोमवारी (दि. १६) सुरुवात झाली. कुलगुरु डॉ. फुलारी यांनी दुसऱ्याच दिवशी विद्यापीठ नाट्यगृहात मंगळवारी प्राचार्यांची सहविचार सभा घेतली. यावेळी प्र-कुलगुरु डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांची मंचावर उपस्थिती होती. कुलगुरु म्हणाले, अकॅडमिक कॅलेंडरचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल. कॉलेजनिहाय प्रवेश समिती स्थापन करावी, तसेच ३० जूनपूर्वी तासिकांचे नियोजन करण्यात यावे. हे वेळापत्रक विद्यापीठाला पाठवावे. २०२७ मध्ये विद्यापीठ ‘क्यूएस रँकिंग’ला सामोरे जाणार आहे. त्यामुळे हे बदल अपेक्षित आहेत. प्र-कुलगुरु डॉ. वाल्मीक सरवदे यांनी प्रास्ताविक केले. संलग्नित महाविद्यालयांनी क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश दिल्यास विद्यापीठ जबाबदार राहणार नाही तसेच तासिका तत्त्वावरील भरतीसाठीदेखील विद्यापीठाची परवानगी लागेल. संचालन कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी केले. प्राचार्यांच्या सभेसाठी पहिल्यांदाच नाट्यगृह खचाखच भरले.

कुलगुरुंनी मांडलेले मुद्दे
- महाविद्यालयातील प्राध्यापकांचे ‘कॅस’ विद्यापीठात होणार.
- ‘नॅक’ची नवीन नियमावली समजून घेण्यासाठी जिल्हानिहाय कार्यशाळा.
- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी प्रत्येकी ५० हजार व १ लाखांचे अनुदान.
- युवामहोत्सव, ‘आविष्कार’चे जिल्हानिहाय आयोजन.
- अनुदानित व विनाअनुदानित असा सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांना ‘आदर्श’ पुरस्कार.
- युवामहोत्सवात किमान तीन प्रकारांत सहभाग घेणे बंधनकारक.
- एकदा जाहीर केलेली दंड माफी कमी करणार नाही. विद्यापीठात कुठे अडवणूक झाल्यास, कामे होत नसल्यास प्राचार्यांना थेट कुलगुरुंना भेटता येईल.

Web Title: Even if one student comes, take a lesson; Vice Chancellor Vijay Phulari warns principals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.