तीन दिवसांनंतरही ‘देवगिरी किल्ला’ धुमसतोय; इतिहासप्रेमींची सतर्कता, 'पुरातत्त्व' लागले कामाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 19:11 IST2025-04-11T17:57:40+5:302025-04-11T19:11:53+5:30
देवगिरी किल्ल्यावर झाडाझुडपांना ८ एप्रिल रोजी भीषण आग लागल्याची घटना घडली. सकाळी लागलेली आग आटोक्यात येण्यास सायंकाळ झाली.

तीन दिवसांनंतरही ‘देवगिरी किल्ला’ धुमसतोय; इतिहासप्रेमींची सतर्कता, 'पुरातत्त्व' लागले कामाला
छत्रपती संभाजीनगर : तीन दिवसांनंतरही ऐतिहासिक देवगिरी (दौलताबाद) किल्ल्यात काही ठिकाणी आग धुमसत असल्याचा प्रकार सतर्क इतिहासप्रेमींमुळे गुरुवारी निदर्शनास आला. ही बाब लक्षात येताच अग्निरोधक यंत्राच्या मदतीने धुमसत असलेली आग आटोक्यात आणण्यात आली. दरम्यान, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणतर्फे किल्ल्यात पडझड झालेल्या ठिकाणी देखाभल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
देवगिरी किल्ल्यावर झाडाझुडपांना ८ एप्रिल रोजी भीषण आग लागल्याची घटना घडली. सकाळी लागलेली आग आटोक्यात येण्यास सायंकाळ झाली. या आगीने संपूर्ण किल्ल्याचा परिसर काळवंडला. या सगळ्यात किल्ल्यातील बारादरीच्या भिंतीतील लाकडात तीन दिवसांनंतरही आग धुमसत होती.
डाॅ. रश्मी बोरीकर, शिरीष तांबे, राजेंद्र मुदखेडकर हे गुरुवारी सकाळी किल्ल्यावर गेले. तेव्हा त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ यासंदर्भात अग्निशमन आणि पुरातत्त्व सर्वेक्षणच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर अग्निरोधक यंत्राचा वापर करून आग विझविण्यात आली.
किल्ल्यावरूनच फोन
आम्ही सकाळी किल्ल्यावर गेलो होतो. तेव्हा बारादरीमधील भिंतीतील लाकूड पेटत असल्याचे निदर्शनास आले. बाटलीतील पाण्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. यासंदर्भात तत्काळ किल्ल्यावरूनच फोन करून अग्निशमन विभागाला, पुरातत्त्व सर्वेक्षणच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली.
- डाॅ. रश्मी बोरीकर.
संवर्धनाचे काम
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणकडून किल्ल्यात पडझड झालेल्या ठिकाणी संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. यातून काही प्रमाणात का होईना, किल्ल्याची दुरवस्था दूर होण्यास मदत होईल, असे इतिहासप्रेमींनी म्हटले.