आठ दिवसांनंतरही संकेत जायभायेचे साथीदार सापडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 20:03 IST2018-03-31T20:02:16+5:302018-03-31T20:03:16+5:30
मित्राला कारखाली चिरडून मारणाऱ्या संकेत प्रल्हाद जायभायेसोबत कारमध्ये असलेले त्याचे तीन साथीदार घटनेच्या आठ दिवसांनंतरही पोलिसांना सापडले नाहीत.

आठ दिवसांनंतरही संकेत जायभायेचे साथीदार सापडेना
औरंगाबाद : मित्राला कारखाली चिरडून मारणाऱ्या संकेत प्रल्हाद जायभायेसोबत कारमध्ये असलेले त्याचे तीन साथीदार घटनेच्या आठ दिवसांनंतरही पोलिसांना सापडले नाहीत. त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी मृत संकेत कुलकर्णी यांच्या नातेवाईकांनी केली.
संकेत संजय कुलकर्णी (रा. पाथरी, जि. परभणी) या तरुणाची २३ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शेकडो लोकांच्या नजरेसमोर आरोपी संकेत जायभायेने कारखाली चिरडून हत्या केली. तेव्हा आरोपी संकेतसोबत विजय जौक (रा. बाळापूर), उमर पटेल आणि संकेत मचे (रा. देवळाई चौैक परिसर) हे कारमध्ये होते. संकेतचे कारमधून अपहरण करून त्यास धडा शिकविण्यासाठी ते एकत्र आले होते. मात्र, संकेत त्यांच्या कारमध्ये बसला नाही आणि तो दुचाकीने तेथून निघून जात असताना आरोपी जायभायेने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर तीन ते चार वेळा कारखाली चिरडून ठार केले.
संकेतला कारखाली वारंवार चिरडत असताना त्याच्या मित्रांनी आणि काही प्रत्यक्षदर्शींनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्यांच्या अंगावरही कार घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न त्याने केला होता. मात्र, कारमध्ये बसलेल्या त्याच्या साथीदारांनी जायभायेला रोखले असते, तर ही घटना टाळता आली असती. त्याच्या साथीदारांनी त्याला रोखले नाही, उलट त्यांनी त्याला साथ दिली आणि त्याला घेऊन ते घटनास्थळावरून पसार झाले. एवढेच नव्हे तर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी जायभायेच्या मोबाईलचे सीम गायब केले. घटनेपासून सर्व आरोपी पसार झाले. त्यांनी त्यांचे मोबाईल बंद ठेवलेले आहेत. तीन पथक ांतील अधिकारी-कर्मचारी आरोपींचा शोध घेत असल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. मात्र, आठ दिवसांनंतरही आरोपींचा कोणताही माग पोलिसांना मिळू शकला नाही, हे विशेष.