दहा हजार अर्जांमध्ये त्रुटी; लाडक्या बहिणीला एकच संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 19:52 IST2024-08-10T19:52:08+5:302024-08-10T19:52:18+5:30
अर्जासाठी महिलांची गर्दी : आतापर्यंत ५ लाख २६ हजार ५११ परिपूर्ण अर्ज

दहा हजार अर्जांमध्ये त्रुटी; लाडक्या बहिणीला एकच संधी
छत्रपती संभाजीनगर : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आपल्या जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ४१ हजार ५४२ महिलांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी तालुकास्तरीय समित्यांनी अर्जांची छाननी करून ५ लाख २६ हजार ५११ परिपूर्ण अर्ज जिल्हास्तरीय समितीकडे पाठविले असून १० हजार ३७ अर्जांमध्ये त्रुटी निघाल्या आहेत. दरम्यान, संबंधित महिलांना त्यासंदर्भात ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अर्जातील त्रुटींच्या दुरुस्तीसाठी सध्या तरी एकच संधी आहे.
अर्जांची पडताळणी व योजनेच्या संनियंत्रणासाठी तालुकास्तरीय समित्या नेमल्या आहेत. तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक अर्जाची पडताळणी करण्यात येते. या पडताळणीत काही जणींनी आधारकार्डची एकच बाजू अपलोड केली. हमीपत्रावर स्वाक्षरी नाही, अर्जावरील आणि आधार कार्डवरील नावात फरक आहे, आधार कार्डनुसार पत्ता नोंदविलेला नाही, बँक खाते आधार लिंक नाही, अर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, १५ वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड यापैकी कोणते एक कागदपत्र जोडलेले नाही किंवा चुकीचे जोडले आहे, या त्रुटी अर्जांमध्ये आढळल्या आहेत.
जिल्ह्यातून दीड लाख अर्ज
जिल्ह्यात ५ लाख ४१ हजार ५४२ महिलांनी अर्ज केले असून यापैकी ५ लाख २६ हजार ५११ परिपूर्ण अर्ज प्राप्त झाले आहेत.
१० हजार अर्जांमध्ये त्रुटी
आतापर्यंत १० हजार ३७ अर्जांमध्ये त्रुटी निघाल्या आहेत.
अर्जात दुरुस्तीसाठी एकच संधी
सध्या तरी अर्जातील त्रुटींच्या दुरुस्तीसाठी फक्त एकच संधी असून यासंदर्भात मंत्रालयीन स्तरावर संधी वाढवून देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
पैसे देऊ नका, स्वत: भरा अर्ज
सध्या माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी अंगणवाडी, आपले सरकार सेवा केंद्र किंवा अन्य ठिकाणी गर्दी दिसत आहे. पण, घरबसल्या आपल्या मोबाइवरदेखील हा अर्ज भरता येतो.
कसा भराल ऑनलाइन अर्ज?
‘नारीशक्ती दूत’ या ॲपच्या माध्यमातून अर्ज भरता येतो. त्यासाठी हे ॲप डाऊनलोड करावे. ते ओपन केल्यानंतर लॉगइन हे ऑप्शन दिसेल. त्यात आपला मोबाइल नंबर टाकावा. मग, मोबाइलवर आलेला ओटीपी टाकून लॉगइन करून घ्यावे. लॉगइन झाल्यानंतर आपली प्रोफाइल तयार करावी. त्यानंतर प्रत्यक्षात अर्ज भरण्याची प्रक्रिया करता येते.