जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
By Admin | Updated: July 29, 2014 01:08 IST2014-07-29T00:27:50+5:302014-07-29T01:08:50+5:30
लातूर : जिल्ह्यात सोमवारी सकाळी सर्वदूर पाऊस झाला असून, जवळपास दोन ते अडीच तास पावसाची रिपरिप सुरू होती. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ताण दिला होता.
जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
लातूर : जिल्ह्यात सोमवारी सकाळी सर्वदूर पाऊस झाला असून, जवळपास दोन ते अडीच तास पावसाची रिपरिप सुरू होती. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ताण दिला होता. त्यामुळे पिके सुकू लागली होती. सोमवारी वरुणराजाने हजेरी लावल्याने या पिकांना जीवदान मिळाले आहे. तरीही मोठ्या पावसाची प्रतीक्षा बळीराजाला आहे.
जिल्ह्यातील जळकोट तालुका वगळता सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून १० वाजेपर्यंत अन्यत्र पाऊस झाला. लातूरसह रेणापूर, औसा, उदगीर, शिरूर अनंतपाळ, चाकूर, निलंगा, देवणी व अहमदपूर तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. जून महिन्यात लातूर जिल्ह्यात फक्त ४७.०७ मि.मी. पाऊस झाला, तर कालपर्यंत ११०.०७ मि.मी. पाऊस झाला आहे. सोमवारी सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत सरासरी ५.०१ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. तर आतापर्यंत ११५.०८ मि.मी. पाऊस झाला आहे. पावसाची ही सरासरी ६६.०५ टक्के आहे. सोमवारी दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही. तरीही हा पाऊस समाधानकारक नाही. नद्या, ओढे, तलाव अद्यापही कोरडेच आहेत. तब्बल दोन ते अडीच तास पाऊस पडूनही पाणी जमिनीबाहेर आले नाही.
शिरूर अनंतपाळ तालुक्याची पावसाची सरासरी ७५० मि.मी. असली, तरी आजपर्यंत केवळ २३१ मि.मी. पाऊस झाला आहे. तर लातूर जिल्ह्याची २८ जुलैपर्यंतची पावसाची सरासरी ३३७.१ मि.मी.ची आहे. परंतु, आतापर्यंत फक्त ११५.८ मि.मी. पाऊस पडला आहे. जुलैअखेर यंदा गतवर्षीच्या तुलनेत कमीच पाऊस झाला आहे.
लातूर जिल्ह्यात आठ मध्यम प्रकल्प आहेत. या आठही मध्यम प्रकल्पांत पाणीसाठा अद्यापही ज्योत्याखालीच आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची गरज आहे. २५ जुलै रोजी जिल्ह्यातील लातूर तालुक्यात २.५० मि.मी., औसा तालुक्यात १.४२ मि.मी., रेणापूरमध्ये ०.७५, उदगीरमध्ये २.२८, चाकूरमध्ये २.२०, निलंग्यामध्ये १.३७, तर शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट, अहमदपूर तालुक्यांत पाऊस निरंक होता. सोमवारी मात्र याही तालुक्यात पावसाची रिपरिप होती. त्यामुळे पिकांना सध्या तरी जीवदान मिळाले आहे. (प्रतिनिधी)
पिकांना जीवदान...
लातूर जिल्ह्यात ५ लाख ५६ हजार ८६० हेक्टर्स खरिपाचे क्षेत्र आहे. यापैकी यंदा ४ लाख ९७ हजार ९१८ हेक्टर्स क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक सोयाबीनचे ३ लाख ३७ हजार १९८ हेक्टर्सवर पेरा झाला आहे. त्याखालोखाल ९१ हजार ०३ हेक्टर्सवर तुरीची पेरणी झाली आहे. या सर्व पिकांसाठी पोषक पावसाची गरज आहे. सध्या रिपरिप झाल्यामुळे बळीराजासाठी दिलासा आहे. पावसाळ्याचे दोन महिने उलटले, मात्र समाधानकारक पाऊस अद्यापही झाला नाही. त्यामुळे सध्याही शहरासह अनेक गावांत पाणीटंचाई आहे. ही पाणीटंचाई दूर होण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
अजूनही सरासरीपेक्षा कमीच पाऊस
रिपरिप पावसामुळे पिकांना मिळाले जीवदान
जळकोट तालुका वगळता जिल्ह्यात सर्वत्र रिपरिप पाऊस
बळीराजाला मिळाला दिलासा