सफारी पार्कमध्येच घ्या टायगर सफारीचा आनंद; जिल्हा प्रशासन देणार लवकरच १७ हेक्टर जमीन
By मुजीब देवणीकर | Updated: August 11, 2023 19:41 IST2023-08-11T19:41:14+5:302023-08-11T19:41:39+5:30
स्मार्ट सिटीअंतर्गत सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे सफारी पार्क होय.

सफारी पार्कमध्येच घ्या टायगर सफारीचा आनंद; जिल्हा प्रशासन देणार लवकरच १७ हेक्टर जमीन
छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मिटमिटा येथे १०० हेक्टर जागेवर भव्यदिव्य सफारी पार्कच्या उभारणीचे काम सुरू आहे. आतापर्यंत या प्रकल्पातील असंख्य अडथळे दूर करण्यात आले. सफारी पार्कला लागूनच खुल्या जंगलात टायगर सफारीचा आनंदही पर्यटकांना घेता येईल. या प्रकल्पासाठी १७ हेक्टर जमीन जिल्हा प्रशासन देणार असून, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
स्मार्ट सिटीअंतर्गत सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे सफारी पार्क होय. जवळपास २५० कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च करण्यात येत आहेत. कोरोना संसर्ग, मिटमिटा येथील १०० हेक्टर जमिनीवरील अतिक्रमणे, शेतकऱ्यांचे आंदोलन आदी कारणांमुळे प्रकल्प उभारणीला प्रचंड विलंब होत होता. स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली. प्रकल्पाच्या जागेवरील अतिक्रमणे जमीनदोस्त केली. काहींवर फौजदारी कारवाई केली. शेतकऱ्यांना ७ मीटरचा रस्ता हवा होता, तो सुद्धा मार्गी लावला. सफारी पार्कमध्ये दोन महत्त्वाचे घटक आहेत.
पहिला प्राण्यांना केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार सोयीसुविधा देणे आणि दुसरा म्हणजे विविध इमारतींची उभारणी होय. दोन्ही कामे जवळपास २५ टक्क्यांहून अधिक झाली असून, डिसेंबर २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे प्रकल्प प्रमुख इम्रान खान यांनी सांगितले.
सफारी पार्कसाठी अग्निशमन विभागाने एनओसी दिली. त्यामुळे पाणीपुरवठा, ड्रेनेज, इलेक्ट्रिक वर्क, अग्निशमन यंत्रणा, सर्व्हिस रोड, जलकुंभ, वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणारा एसटीपी प्रकल्प उभारण्यास गती दिली जाईल. प्राण्यांसाठी ४० मोठमोठे पिंजरे, घरे उभारण्याचे उद्दिष्ट असून, त्यातील २९ पूर्ण करण्यात आले. १५ पैकी १० इमारतींचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील पहिलाच प्रकल्प
ओपन टायगर सफारी हा प्रकल्प राज्यात कुठेही नाही. आरक्षित खुला प्रकल्प आहेत. ओपन सफारीमुळे पर्यटनाच्या राजधानीत पर्यटकांचा ओढा दुपटीने वाढेल. १७ हेक्टरवरील हा प्रकल्प बराच मोठा असणार असून, येथील वातावरण प्राण्यांना पोषक असणार आहे. जन्मदरही वाढणार असल्याचे त्यांनी नमूद केले.