मातृभाषेबरोबर इंग्रजी, गणितही महत्त्वाचे

By Admin | Updated: June 22, 2014 00:07 IST2014-06-22T00:02:28+5:302014-06-22T00:07:50+5:30

उस्मानाबाद : दहावी, बारावी परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांची एकच धावपळ उडाल्याचे दिसत आहे़

English with Math, and mathematics are important | मातृभाषेबरोबर इंग्रजी, गणितही महत्त्वाचे

मातृभाषेबरोबर इंग्रजी, गणितही महत्त्वाचे

उस्मानाबाद : दहावी, बारावी परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांची एकच धावपळ उडाल्याचे दिसत आहे़ प्ले ग्रुपपासून ज्युनिअर केजी, सिनिअर केजीसह इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच पाल्याला भरती करण्याकडे अनेकांनी भर दिला आहे़ प्रवेशासाठी महाविद्यालयातही विद्यार्थ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे़ या अनुषंगाने ‘लोकमत’ने जिल्ह्यातील काही प्राचार्य, प्राध्यापकांची मते जाणून घेतली़ त्यातून मातृभाषेबरोबरच इंग्रजी, गणित आणि विज्ञान शाखेला सध्याच्या परिस्थितीत महत्त्व असल्याचे प्राचार्यांनी सांगितले़
आपला मुलगा डॉक्टर, इंजिनिअर व्हावा, हे प्रत्येक आई-बाबांंच स्वप्न ! डॉक्टर, इंजिनीअर झाला नाही तर सरकारी नोकरी मिळावी, अशी अनेकांची अपेक्षा ! मुलांच्या भविष्यासाठी पालक पैशाकडे न पाहता शाळेची गुणवत्ता पाहून पाल्यांच्या प्रवेशासाठी करताना दिसत आहेत़ संगणकाच्या, जागतिकीकरणाच्या युगात आपला मुलगा टिकून रहावा, यासाठी इंग्रजीचे महत्त्वही सर्वांना समजू लागले आहे़ शहरी भागात विशेषत: ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा त्यामुळे ओस पडू लागल्या आहेत़ जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्रजी शिकविले जात असले तरी विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारत नसल्याचा आरोप पालकांतून वारंवार होत आला आहे़ जिल्हा परिषदेच्या काही शाळांचे अपवाद वगळता गुणवत्तेबाबत वारंवार प्रश्न उभा केले गेले आहेत़ त्यामुळे प्लेग्रुपला हजारो रूपये देवून आपल्या मुला-मुलींना अनेकजण घालत आहेत़ शहरी भागातील गल्ली-बोळात, ग्रामीण भागातही इंग्लिश स्कूल सुरू झाले आहेत़ मुलाचे भविष्य काय रहावे यासाठी पालकांचा ओढा असला तरी मुलांची स्वप्ने, त्यांची आवड काय हे जाणून घेण्याची गरज असल्याचेही अनेकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ मुलांचे भविष्य घडवायचे असेल तर पाया चांगला असला पाहिजे़ दहावीनंतर विज्ञान शाखेबरोबरच कला, वाणिज्य शाखेतील मुलांना संधी आहेत. महत्वाचे म्हणजे प्रवेश घेताना विद्यार्थ्याचा कल, त्याची आवड या बाबी प्राधान्याने विचारात घेण्याची आवश्यकताही या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांचा कल महत्त्वाचा
पालकांनी अनेक स्वप्ने रंगविली असली तरी प्रत्येक विद्यार्थ्याची बौध्दिक क्षमता सारखी नसते़ त्यामुळे त्या विद्यार्थ्याचा कल कोणत्या शाखेकडे आहे हे अगोदर पाहणे गरजेचे आहे़ कला, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना पुढे संधी आहेत़ विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना त्यापेक्षाही अधिक संधी आहेत़ मात्र, प्रत्येक विद्यार्थी विज्ञान शाखेचा अभ्यासक्रमात आणि पुढील वाटचालीत टिकेल की नाही, याची शाश्वती नसते़ त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांच्या मनावर बोजा घालण्याऐवजी त्यांचा कल पाहून त्या-त्या शाखेत प्रवेश मिळवून द्यावा, असे मत उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ युवराज भोसले यांनी व्यक्त केले़
तंत्रशिक्षणाची गरज
आजच्या काळात शिकलेली पाल्येही इंटरनेटसह इतर बाबींसाठी आपल्या मुलांकडून आधार घेत माहिती मिळवित आहेत़ त्यामुळे जागतिकीकरण, तंत्रज्ञानाच्या युगात टिकण्यासाठी तंत्रशिणाला महत्त्व आले आहे़ संगणक ज्ञान ही काळाची गरज बनले आहे़ मराठी, हिंदी विषयाच्या शिक्षणाबरोबर इंग्रजीला महत्त्व आले आहे़ कला शाखेतील विद्यार्थ्यांनी चांगले विषय घेतले तर पुढे संधी आहेत़ वाणिज्य शाखेतील विद्यार्थी बँकींगसह इतर क्षेत्रात भविष्य बनवू शकतो़ विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना अधिक संध असल्याचे परंडा येथील शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य एल़एम़तायडे यांनी सांगितले़
ग्रामीण भागावर भर गरजेचा
ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे़ शहरी भागातील शैक्षणिक गुणवत्ता आणि ग्रामीण भागातील गुणवत्ता यात मोठा फरक जाणवू लागल्याने ग्रामीण भागातील शाळा ओस पडत असल्याचे चित्र आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील पहिलीपासून मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची गरज आहे़ दहावीनंतर कला, वाणिज्य शाखेबरोबरच विज्ञान शाखेला विद्यार्थ्यांनी महत्त्व दिल्यानंतर भविष्यात अनेक संधी उपलब्ध होतात़ मातृभाषेबरोबरच इंग्रजी, हिंदीचे शिक्षण महत्त्वाचे असल्याचे उमरगा येथील भारत विद्यालयाचे प्रा़डॉ़शौकत पटेल यांनी सांगितले़
पाया पक्का होण्याची गरज
मुलांनी डॉक्टर, इंजिनिअर व्हावं, असे प्रत्येक पालकाला वाटते़ मात्र, मुलांची आवड कोणत्या विषयात आहे, हे पाहणे गरजेचे आहे़ मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी त्यांचा पाया पहिली ते दहावी पर्यंत पक्का होण्याची गरज आहे़ शिक्षकांबरोबरच पालकांनी त्यासाठी सातत्याने लक्ष देण्याची गरज आहे़ कला, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांपेक्षा विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना भविष्यात भरपूर संधी आहेत़ त्यामुळे विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेतून शिक्षण घेण्याची गरज असल्याचे उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ एऩडी़शिंदे म्हणाले़
विज्ञान शाखेला महत्त्व
विद्यार्थ्यांना आज पहिलीपासून इंग्रजी विषयाचे धडे देण्यात येत आहेत़ आधुनिक युगात संगणकाचे ज्ञानही महत्त्वाचे झाले आहे़ मुलांच्या बौध्दिक क्षमतेनुसार त्यांच्या भविष्याच्या वाटचालीची दिशा निर्धारित होते़ त्यानुसार शिक्षक, पालकांनी लक्ष दिले तर विज्ञान शाखेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात संधी आहेत़असे उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्राचार्या आऱडी़हुंडेकरी यांनी सांगितले़
बळजबरीने यश मिळत नाही
वाढलेली स्पर्धा आणि जागतिकीकरणाच्या युगात मातृभाषेबरोबर हिंदी, इंग्रजी भाषा येणे गरजेचे आहे़ इंग्रजीचे महत्त्व सर्वांना कळाल्याने पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकविण्यासाठी पालक प्रयत्नशील आहेत़ दहावीनंतर विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमता आणि त्यांची आवड पाहणे गरजेचे आहे़ बळजबरीने विज्ञान शाखेत शिक्षणाला घातल्यानंतर पुढे त्या विद्यार्थ्यांनी परत कला शाखेत प्रवेश घेतल्याचे अनेक अनुभव आहेत़ त्यामुळे पालकांनी शाखा निवडीची बळजबरी न करता विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार प्रवेश घेण्यास प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे भूम येथील शंकरराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य बी़पी़भैरट यांनी सांगितले़

Web Title: English with Math, and mathematics are important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.