खेळताखेळता फिनाईल पिल्याने दीड वर्षाच्या बालकाचा अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 13:45 IST2021-02-26T13:43:53+5:302021-02-26T13:45:37+5:30
आई आणि अन्य नातेवाईक आपापल्या कामात व्यग्र असताना चिमुकल्याने घरातील फिनाईलची बाटली उचलली आणि तोंडाला लावली.

खेळताखेळता फिनाईल पिल्याने दीड वर्षाच्या बालकाचा अंत
औरंगाबाद : खेळताना घरातील फरशी स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे फिनाईल पिल्याने दीडवर्षीय चिमुकल्याचा अंत झाला. ही घटना बुधवारी, २४ फेब्रुवारी रोजी दुपारी संजयनगर, बायजीपुरा येथे घडली.
मोईनुद्दीन शेख असे मृत बालकाचे नाव आहे. जिन्सी ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी सांगितले की, मोईनुद्दीन (रा. संजयनगर) हा दीड वर्षाचा चिमुकला बुधवारी दुपारी घरात खेळत होता. त्याची आई आणि अन्य नातेवाईक आपापल्या कामात व्यग्र असताना चिमुकल्याने घरातील फिनाईलची बाटली उचलली आणि तोंडाला लावली. हे विष तोंडात जाताच तो रडू लागला. त्याच्या आवाजाने आईने त्याच्याकडे धाव घेतली तेव्हा त्याच्या हातात फिनाईलची बाटली तिने हिसकावून घेत फेकून दिली. यानंतर त्याला लगेच घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घाटीत उपचार सुरू असताना रात्री ९:३० वाजता त्याचा मृत्यू झाला. याविषयी जिन्सी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.