जायकवाडी धरण परिसरात ५६ हेक्टरवर अतिक्रमण; काढण्यासाठी महानगरपालिका मदत करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 17:51 IST2025-12-10T17:50:44+5:302025-12-10T17:51:38+5:30
कारवाईसाठी महानगरपालिका जेसीबी, मनुष्यबळ व इतर आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देईल.

जायकवाडी धरण परिसरात ५६ हेक्टरवर अतिक्रमण; काढण्यासाठी महानगरपालिका मदत करणार
छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणाच्या परिसरात जवळपास ५६ हेक्टर जमिनीवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. अनेक वर्षांपासून हे अतिक्रमण असून, ते काढणे जिल्हा परिषद आणि जलसंपदा विभागाला अडचणी येत आहे. त्यामुळे मंगळवारी महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. बैठकीत जि.प. आणि जलसंपदा विभागाने मनपाला अतिक्रमण काढण्यास मदत करण्याची विनंती केली. प्रशासकांनी ही विनंती मान्य केली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित बैठकीला उपस्थित होते. बैठकीत अतिक्रमणाच्या गंभीर मुद्यावर चर्चा करण्यात आली. पुढच्या आठवड्यात कारवाई करण्याचे आश्वासन मनपा प्रशासकांनी दिले. यावेळी प्रशासकांनी सांगितले की, कारवाई करण्यापूर्वी महावितरण कंपनीकडून संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित करण्यात यावा. भोंगा फिरवून सर्व अतिक्रमणधारकांना स्वतः अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन करावे. या ठिकाणी शाळा असेल तर ती स्थलांतरित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कारवाईसाठी महानगरपालिका जेसीबी, मनुष्यबळ व इतर आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देईल.
बैठकीत मुख्य अभियंता तथा मुख्य प्रशासक सुनंदा जगताप, प्रकल्प संचालक डीआरडीए अशोक शिरसे, महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, सहायक आयुक्त सविता सोनवणे, कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, कार्यकारी अभियंता महावितरण शैलेश कलंत्री, ग्रामपंचायत अधिकारी प्रभाकर पठारे, तंटामुक्ती अध्यक्ष रामजी मोरे, सरपंच धनंजय मोरे, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड आदींची उपस्थिती होती.
जायकवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण
बैठकीत संबंधित विभागांनी दिलेल्या माहितीनुसार जायकवाडी उत्तर वसाहतीत तात्पुरत्या स्वरूपाची (पत्र्याची) एकूण ३५० निवासस्थाने, पक्की (स्लॅबची) ९० निवासस्थाने, ११० अनधिकृत वसाहती, एकूण ३० व्यावसायिक अतिक्रमणधारक असून एकूण अतिक्रमित क्षेत्र ४० हेक्टर इतके आहे. याशिवाय जायकवाडी दक्षिण वसाहतीत तात्पुरत्या स्वरूपाचे २०५ घरे, व्यावसायिक अतिक्रमणधारकांची संख्या ४० आहे. या ठिकाणी एकूण अतिक्रमित क्षेत्र १६ हेक्टर आहे.