सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण
By Admin | Updated: October 7, 2014 00:45 IST2014-10-07T00:24:17+5:302014-10-07T00:45:23+5:30
वाळूज महानगर : सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर अनेकांनी अतिक्रमण केले असून, काहींनी तर येथे व्यवसाय थाटला आहे.

सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण
वाळूज महानगर : सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर अनेकांनी अतिक्रमण केले असून, काहींनी तर येथे व्यवसाय थाटला आहे. मात्र, या अतिक्रमणांकडे सिडको प्रशासन डोळेझाक करीत असल्यामुळे दिवसेंदिवस यात भरच पडत आहे. प्रशासनाच्या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्र्चेला ऊत आला आहे.
सिडको प्रशासनाच्या मालकीच्या असलेल्या मोकळ्या भूखंडावर अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. सिडकोच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून काहींनी तर पत्र्याचे शेड टाकून आपला व्यवसायही उभारला आहे. बजाजनगरातून सिडको वाळूज महानगरातील साईनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्याशेजारी असलेली झाडे तोडून जेसीबीच्या साह्याने साफसफाई करून त्या ठिकाणी व्यवसाय सुरू केला आहे. तसेच साईनगर व सिडको उद्यान या भागातून येणारे पावसाचे पाणी व सांडपाणी वाहून जाण्यासाठी बांधलेल्या सिमेंटच्या नालीवर मुरमाचा भर टाकून ३० ते ४० मीटर सांडपाण्याची नालीच बुजविली आहे.
या जागेचा वापर वाहनतळासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे वडगाव कोल्हाटी- तीसगाव रस्त्याकडून वाहून येणाऱ्या सांडपाण्याला अडथळा निर्माण झाला आहे. पाणी वाहून जाण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने नालीतील सांडपाणी तुंबून मुख्य रस्त्यावर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, याकडे सिडको प्रशासन डोळेझाक करीत असून प्रशासनातीलच काही अधिकारी माहिती असूनही आर्थिक हितापोटी अतिक्रमणधारकांना अभय देत
आहेत.
विशेष म्हणजे या रस्त्यावरून सिडको अतिक्रमण हटाव पथक कायम येरझारा मारत असते. तरीही सिडकोच्या पथकाला हे अतिक्रमण दिसत नाही का, असा नागरिकांमधून प्रश्न उपस्थित केला जात आहे.