पाणीपुरवठ्याचे कर्मचारी संपावर
By Admin | Updated: June 3, 2014 00:42 IST2014-06-03T00:32:52+5:302014-06-03T00:42:25+5:30
परभणी: महानगरपालिकेअंतर्गत पाणीपुरवठा विभागातील कामगार- कर्मचार्यांनी थकित वेतन व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी २ जूनपासून बेमुदत संप पुकारला आहे.

पाणीपुरवठ्याचे कर्मचारी संपावर
परभणी: महानगरपालिकेअंतर्गत पाणीपुरवठा विभागातील कामगार- कर्मचार्यांनी थकित वेतन व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी २ जूनपासून बेमुदत संप पुकारला आहे. पाणी पुरवठा विभागातील वर्ग ३ व वर्ग ४ कायम कर्मचारी व रोजंदारी कर्मचारी १०० टक्के या संपात सहभागी झाले आहेत. मराठवाडा न. प. व मनपा कामगार कर्मचारी युनियनने संपासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रशासनाने चर्चेमध्ये केवळ कोरड्या आश्वासनांशिवाय कोणताही प्रश्न सोडविला नाही. कामगार, कर्मचार्यांना सहा-सहा महिने वेतन दिले जात नाही मात्र काही विशिष्ट कर्मचार्यांना मात्र मागील दरवाजाने लाखो रुपये अदा करुन विशेष लाभ दिले आहेत. ठराविक कर्मचार्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची संपूर्ण रक्कम अदा करण्यात आली आहे. जवळपास ३० कर्मचार्यांना हा विशेष लाभ देण्यात आला आहे. परंतु ५ हजार रुपये दरमाह वेतन घेणार्या रोजंदारी कामगारांचे वेतन ७ महिन्यांपासून थकले आहे. किमान वेतनाचा शासन निर्णयही अंमलात आणला जात नाही. सात महिन्यांपासून पगार झाला नसल्याने कर्मचार्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पगाराअभावी दररोजचा दिवस कसा काढावा, असा मोठा निर्माण झाला आहे. प्रशासन मात्र या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याने आंदोलन सुरू करण्यात आले. आयटक प्रणित मनपा कामगार- कर्मचारी युनियनचे कॉ. राजन क्षीरसागर, पाणीपुरवठा विभागाचे अध्यक्ष शेख आयुब, प्रकाश जाधव, मनोहर गवारे, गणेश गायकवाड, काशिनाथ वाघमारे, अविनाश पाठक, चंद्रकांत मोरे आदी प्रयत्नशील आहेत. (प्रतिनिधी)टंचाईच्या काळात जनतेच्या रोषाला कनिष्ठ कर्मचार्यांनाच तोंड द्यावे लागते. मात्र प्रशासनाने कालबद्ध पदोन्नती, किमान वेतन, पगारी सुट्या, रजा आदी कर्मचार्यांच्या सुमारे २९ मागण्या सोडविण्याचा प्रयत्न देखील केला नाही. वेळोवेळी केलेल्या संपात मंजूर मागण्यांची फाईल पुढचा संप करेपर्यंत उघडायचीच नाही, या प्रकारामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्या मागण्यांची तड लावल्याशिवाय माघार घ्यायची नाही, असा निर्धार कामगारांनी केला आहे.