हरभरा केंद्राच्या मुदतवाढीसाठी जोर
By Admin | Updated: May 8, 2014 23:20 IST2014-05-08T23:19:55+5:302014-05-08T23:20:44+5:30
लातूर : नाफेडच्या वतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून लातुरात सुरु असलेल्या हरभरा खरेदी केंद्राला मुदतवाढ देण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे़

हरभरा केंद्राच्या मुदतवाढीसाठी जोर
लातूर : नाफेडच्या वतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून लातुरात सुरु असलेल्या हरभरा खरेदी केंद्राला मुदतवाढ देण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे़ हरभरा विक्रीसाठी आलेल्या शेतकर्यांना चार-चार दिवस वेटिंग असल्याने बरेच शेतकरी अडकून पडले आहेत़ शिवाय, हरभर्याची आवक सुरुच आहे़ त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येऊ लागली आहे़ लातुरातील एमआयडीसी भागात वखार महामंडाळाच्या गोदामांमध्ये सुरु असलेल्या हरभरा खरेदी केंद्रावर ३१०० रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात येत असल्याने शेतकर्यांची चांगलीच गर्दी होऊ लागली आहे़ बाजार समित्यांमध्ये उच्च प्रतीच्या हरभर्याला केवळ २५०० ते २७०० रुपये इतकाच दर मिळत असल्याने शेतकरी या केंद्राकडे वळले आहेत़ त्यामुळे खरेदी केंद्रावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत़ केंद्रात मनुष्यबळ कमी असल्याने चार काट्यांवरुनच वजन केले जात आहे़ त्यामुळे शेतकर्यांना चार-चार दिवसांची वेटिंग लागली आहे़ वाहनाचे भाडे सोसून ते रांगेत आहेत़ दरम्यान, १० मे पासून हे खरेदी केंद्र बंद करण्याच्या सूचना नाफेडने दिल्या आहेत़ त्यामुळे शेवटच्या टोकाला असलेल्या शेतकर्यांना आपला नंबर लागेल की नाही, याची शाश्वती नसल्याने त्यांची घालमेल वाढली आहे़ शिवाय, नव्याने येणार्या शेतकर्यांनाही आपल्या हरभर्याचा काटा होईल, याची शाश्वती नाही़ त्यामुळे आता केंद्राच्या मुदतवाढीची मागणी जोर धरु लागली आहे़ माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी या केंद्रावरील शेतकर्यांची भेट घेऊन मार्केटिंग फेडरेशन व नाफेडकडे ३० मेपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे़ तसेच लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीनेही शेतकर्यांचे हीत लक्षात घेऊन १० मे रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत खरेदी केंद्रावर येणार्या शेतकर्यांच्या नोंदी घेऊन त्यांचा माल घेण्याची विनंती लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे़ दरम्यान, शेतकर्यांची मागणी, तसेच बाजार समिती, माजी आमदार कव्हेकर यांनी दिलेल्या निवेदनाच्या आधारे मार्केटिंग फेडरेशनने नाफेडकडे मार्गदर्शन मागविले आहे़ त्यांची परवानगी मिळाल्यास केंद्रास मुदतवाढ देण्यात येईल, असे फेडरेशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले़(प्रतिनिधी)