वेरूळ-अजिंठा महोत्सव टांगणीला; पैशांची जुळवाजुळव होत नसल्यामुळे ठरेना तारीख
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 17:19 IST2025-03-06T17:19:35+5:302025-03-06T17:19:56+5:30
आजवर जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात महोत्सवाचे आयोजन केले गेले. यंदा मात्र महोत्सव लांबला आहे.

वेरूळ-अजिंठा महोत्सव टांगणीला; पैशांची जुळवाजुळव होत नसल्यामुळे ठरेना तारीख
छत्रपती संभाजीनगर : यंदाचा वेरुळ - अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव पैशांची जुळवाजुळव होत नसल्यामुळे टांगणीला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात महोत्सव होईल, असे नियोजन हेाते. मात्र, सध्या महोत्सव आयाेजनाबाबत काहीही हालचाली नसल्यामुळे महोत्सव होण्याबाबत साशंकता आहे. मागच्या वर्षीची थकबाकी व यंदाचा खर्च मिळून सहा ते आठ कोटी रुपयांचा निधी महोत्सवासाठी उभा करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते आहे.
आजवर जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात महोत्सवाचे आयोजन केले गेले. यंदा मात्र महोत्सव लांबला आहे. दोन ते तीन बैठका झाल्या. निधी उभारण्यावर बैठकीत खल झाला. मागील देणे आणि यंदाचा खर्च याबाबत काहीही मेळ बसत नसल्यामुळे यंदाचा महोत्सव होण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. यंदाच्या महोत्सवासाठी म्हणून सुमारे साडेसहा कोटींचा खर्च अपेक्षित आहे. महापालिका व पर्यटन विभागाकडून काही निधी मिळेल, तर उर्वरित निधीसाठी शासनाकडे मागणी करणे तसेच कंपन्यांच्या सीएसआर फंड मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे प्रयत्न सुरू आहेत. मार्च महिन्याचा पहिला आठवडा संपत आला आहे, तरीही महोत्सवाच्या आयोजनाबाबत ठोस निर्णय झालेला नाही. पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने हा महोत्सव महत्त्वाचा आहे.
१.७५ कोटींचे देणे बाकी...
गेल्यावर्षीचे १ कोटी ८५ लाख रुपये देणे बाकी आहे. त्यात विद्युत रोषणाई, डेकोरेशन व इतर बिलांचा समावेश आहे.
१९८५ पासून महोत्सवाला सुरुवात
जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने १९८५ साली वेरुळ येथील कैलास लेणी समोरील महोत्सव आयोजित करण्यास सुरूवात केली होती. या महोत्सवाचे रूपांतर २००२ पासून वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सोनेरी महलात भरविण्यात येऊ लागला. २४ वर्षांत १४ वेळा महोत्सवाला खंड पडला.
आता महोत्सव लेण्यांच्या पायथ्याशी...
सोनेरी महल परिसरात महोत्सव भरविण्यास न्यायालयाच्या आदेशामुळे स्थगिती आली आहे. त्यामुळे यावर्षीचा महोत्सव वेरूळ लेण्यांच्या पायथ्याशी दोन दिवस आणि. एक दिवस शहरात घेण्याचा निर्णय झाला आहे.