धावत्या नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये अडकली विद्युतीकरणाची वायर, सुदैवाने मोठा अपघात टळला
By संतोष हिरेमठ | Updated: March 10, 2023 23:33 IST2023-03-10T23:33:11+5:302023-03-10T23:33:32+5:30
सुदैवाने अपघात टळला : दीड तासावर रेल्वे अंधारात, इतर रेल्वेगाड्यांवर परिणाम

धावत्या नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये अडकली विद्युतीकरणाची वायर, सुदैवाने मोठा अपघात टळला
छत्रपती संभाजीनगर : मुंबईला जाणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये विद्युतीकरणची वायर अडकल्याची घटना शुक्रवारी रात्री ९.२० वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन ते शिवाजीनगर रेल्वेगेटदरम्यान घडली. या घटनेनंतर रेल्वे चालकाने वेळीच रेल्वे थांबवली. रात्री ११ वाजेपर्यंत ही रेल्वे मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन ते शिवाजीनगर रेल्वेगेटदरम्यान अंधारात उभी होती.
घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी-कर्मचारी, रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. इंजिनमध्ये वायर अडकल्यानंतर जवळपास एक किलोमीटर रेल्वे पुढे जाऊन थांबली. या घटनेमुळे मुंबईत जाणारे प्रवासी रेल्वेस्टेशनवर ताटकळले आहे.
दरम्यान, रेल्वे केबल दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तरी बारा वाजेपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती संतोष कुमार सोमानी यांनी दिली आहे.