शाळाबाह्य प्रौढांनाही आठवी समकक्षतेचे प्रमाणपत्र

By Admin | Updated: July 7, 2014 00:16 IST2014-07-06T23:38:37+5:302014-07-07T00:16:32+5:30

संजय कुलकर्णी , जालना पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेताना ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही, त्यांची परीक्षा घेऊन इयत्ता आठवीचे समकक्षतेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Eighth equivalent certificate for out-of-school children | शाळाबाह्य प्रौढांनाही आठवी समकक्षतेचे प्रमाणपत्र

शाळाबाह्य प्रौढांनाही आठवी समकक्षतेचे प्रमाणपत्र

संजय कुलकर्णी , जालना
पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेताना ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही, त्यांची परीक्षा घेऊन इयत्ता आठवीचे समकक्षतेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी निरंतर शिक्षण योजनेद्वारे कार्यात्मक साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
निरंतर शिक्षण कार्यालयामार्फत निरक्षरांना साक्षर करण्याची मोहीम राबविली जाते. जालना जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण ७१ टक्के इतके आहे. यापूर्वी निरंतर शिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाकडून जिल्हा साक्षरता परिषदेस अनुदान प्राप्त होत होते. परंतु सदर कार्यक्रम केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने बंद केल्यामुळे निरंतर शिक्षण केंद्रे बंद करण्यात आलेली आहेत.
या पार्श्वभूमीवर निरंतर शिक्षणांतर्गत कार्यात्मक साक्षरता कार्यक्रम राज्य शासन, स्थानिक संस्था, सीएसआर व एनजीओ यांच्या मदतीने पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. सन २०११ च्या जनगणनेप्रमाणे १५ वर्षे वयापुढील निरक्षरांना तसेच इयत्ता १ ली ते ३ री, इयत्ता ४ थी ते ५ वी व इयत्ता ७ वी ते ८ वी पर्यंतचे शिक्षण घेताना शाळाबाह्य झालेल्या प्रौढांना परीक्षेला बसवून त्यांना एनआयओएसचे इयत्ता ८ वी चे समकक्षतेचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय पुणे यांच्या वतीने जिल्ह्यात पूर्वी सुरू असलेली निरंतर शिक्षण केंद्रांची संख्या, निरक्षरांची संख्या, नवसाक्षरांची संख्या, तसेच शाळाबाह्य झालेल्या प्रौढांची संख्या मागविण्यात आली आहे. याबाबत निरंतर शिक्षणाधिकारी तथा जि.प.चे माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास शेवाळे म्हणाले की, कार्यात्मक साक्षरता कार्यक्रम राबविण्यासाठी निरंतर शिक्षण विभागाने माहिती मागविली आहे.
जुना कार्यक्रम बंद
निरंतर शिक्षण विभागामार्फत गेल्या दोन वर्षांपूर्वी ‘साक्षर भारत कार्यक्रम’ सुरू केला होता. त्यासाठी प्रत्येकी २ हजार रुपये मानधनावर जिल्ह्यात १५६२ प्रेरक नियुक्त करण्यात आले होते. तर स्वेच्छेने मोफत सेवा देण्यासाठी ७८१ ग्रामपंचायतींद्वारे स्वयंसेवकांचीही निवड करण्यात आली होती. मात्र हा कार्यक्रम बंद पडला.

Web Title: Eighth equivalent certificate for out-of-school children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.