शिक्षणाला दुसरा पर्याय नाही -तेजश्री प्रधान
By Admin | Updated: December 31, 2014 01:04 IST2014-12-31T00:04:10+5:302014-12-31T01:04:22+5:30
औरंगाबाद : क्षेत्र कोणतेही असो, त्या क्षेत्रात कार्य करण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. विद्यार्थिदशेत असताना वाचन- लिखाण या गोष्टींवर भर देणे आवश्यक आहे. वाचनाने ज्ञानात भर पडते.

शिक्षणाला दुसरा पर्याय नाही -तेजश्री प्रधान
औरंगाबाद : क्षेत्र कोणतेही असो, त्या क्षेत्रात कार्य करण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. विद्यार्थिदशेत असताना वाचन- लिखाण या गोष्टींवर भर देणे आवश्यक आहे. वाचनाने ज्ञानात भर पडते. आज जरी अभिनय क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत असले तरी मी माझे शिक्षण पूर्ण करूनच या क्षेत्राकडे वळले, असे मत अभिनेत्री तेजश्री प्रधानने व्यक्त केले.
एलोरा स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याची प्रमुख पाहुणी म्हणून तेजश्रीची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर अशोक तांबटकर, संजय तायडे पाटील, प्रल्हाद शिंदे, मुख्याध्यापिका संगीता शिंदे आदींची उपस्थिती होती.
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. गायन, नृत्य, नाटिका आदी कलाप्रकारांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. ‘अग्निपथ’ या चित्रपटातील ‘गुण गुण गुणा रे गुण गुणा...’, ‘क्या सुपर कूल हैं हम’ या चित्रपटातील ‘दिल गार्डन गार्डन हो गया...’ या गाण्यांवर चिमुकले थिरकले. या कार्यक्रमातच विद्यार्थ्यांनी ड्युएट, फ्युजन नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली. ‘डोला रे डोला...’ यासारखी अनेक लक्षवेधक गाणीही सादर झाली. नित्या काजळे या चिमुकलीच्या बहारदार लावण्यांचे सादरीकरण होत असताना तेजश्रीचा प्रवेश झाला. तिने या चिमुकलीच्या लावणी नृत्याचा आनंद घेतला. या चिमुकलीने ‘रेश्माच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी...’, ‘ही पोरी साजूक तुपातली...’सह ‘जांभुळ पिकल्या झाडाखाली...’ आदी गाण्यांवर उत्कृष्ट नृत्य सादर केले. तेजश्रीच्या व्यासपीठावरील प्रवेशाने कार्यक्रमस्थळी टाळ्या व शिट्यांचा आवाज गुंजला.
‘जय जय महाराष्ट्र माझा’च्या घोषात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेल्या दीप प्रज्वलनाने सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर शालेय अहवालाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर सत्कार सोहळ्यास सुरुवात झाली. यात उपस्थित पालकांना आपल्या लाडक्या तेजश्री ऊर्फ जान्हवीसोबत फोटो काढता आले. तसेच वर्षभरातील गुणवत्ताधारक पालकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी अजय अतुल यांच्या अल्बममधील ‘मोरया मोरया..’, ‘मंै तेनु समझावॉ की...’ हे ड्युएट नृत्यासह सोलो, फ्युजन यासारखे नृत्य प्रकार सादर केले. ‘बुलेट राजा’ या चित्रपटातील ‘तत्तड तत्तड...’ या गाण्यासह ‘काठी न घोंगडं घेऊ द्या की रं’ या गाण्याने मराठमोळा तडका अनुभवास मिळाला.
सूत्रसंचालन रजनी जगताप, हरजित कौर सौदी यांनी केले. उपस्थित सर्व पालकांनी चिमुकल्यांना प्रोत्साहन दिले.