हृदयासाठी उडीद डाळ खा; पण भाव कसा परवडेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:20 IST2025-03-17T12:14:43+5:302025-03-17T12:20:02+5:30

उडीद डाळीत प्रोटिन्स, फायबर, आणखी काय?

Eat urad dal for your heart; but how can you afford it? | हृदयासाठी उडीद डाळ खा; पण भाव कसा परवडेल?

हृदयासाठी उडीद डाळ खा; पण भाव कसा परवडेल?

छत्रपती संभाजीनगर : इडली, डोसा, उतप्पाचा नाश्ता सर्वांनाच आवडतो. यात उडीद डाळीचा समावेश असतो. दररोजच्या जेवणात अनेकजण उडदाचे पापड चवीने खात असतात. तेही उडीद डाळीपासून तयार केलेले असतात. ही डाळ प्रोटिन्सचा मुख्य स्रोत आहे. होय, या डाळीचे पदार्थ खाणे फायदेशीर आहे. महाग असली तरी दैनंदिन जीवनात उडीद डाळीचा वापर असावा.

उडीद डाळीत प्रोटिन्स, फायबर, आणखी काय?
उडदाच्या डाळीत प्रथिने, फायबरसह लोह, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारख्या आवश्यक खनिजांचा समावेश असतो.
ही डाळ एक बहुमुखी आणि पौष्टिक अन्न ठरत आहे.

हृदय निरोगी राहते ; वजन कमी करते
उडीद डाळीतील भरपूर प्रमाणातील फायबर, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवायला मदत करतात. डाळीचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते. वजन कमी करणाऱ्यांसाठी ही डाळ उपयोगी ठरते.

उडीद डाळ एक, फायदे अनेक
१) रक्तवाहिन्यांतील ताण कमी करायला मदत होते. पोटॅशियममुळे रक्तदाब आटोक्यात राहायला मदत होते.
२) उडीद डाळीच्या नियमित सेवनामुळे लघवीचे प्रमाण योग्य ठेवायला मदत होते. शरीरातील अशुद्धी, हानिकारक घटक बाहेर टाकायला मदत होते.
३) शरीरांतर्गत दाह कमी करण्यासाठी, मेटाबोलिक रेट वाढविण्यासाठी आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी उडीद डाळ औषधी म्हणून उपयोगी पडते.
४) पचनशक्ती चांगली राहते. तसेच न पचलेले अन्न शरीराबाहेर टाकायला मदत करते.
५) डायबिटीस असलेल्या व्यक्तींमध्ये ब्लड शुगर नियंत्रित करायला उडीद डाळीचा आहारातील वापर फायदेशीर ठरतो.

उडीद डाळ ११४ रुपये किलो
सध्या उडीद डाळीचा भाव ११० ते ११४ रुपये किलो आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात उडीद डाळ ११० ते १२० रुपये किलोने मिळत होती. मध्यंतरी शंभरीच्या आत उडीद डाळ विकत होती. जानेवारीत पुन्हा भाव वाढून १२० रुपये किलोपर्यंत विकत होती. त्यानंतर भाव कमी झाले. पुढे भाव स्थिर राहतील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Web Title: Eat urad dal for your heart; but how can you afford it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.