अजिंठा लेण्यांत ई-वाहनेच ‘डिस्चार्ज’; एसटीवर मदार, पेंटिंग सुरक्षित राहणार तरी कशी?
By संतोष हिरेमठ | Updated: November 7, 2025 18:00 IST2025-11-07T17:59:32+5:302025-11-07T18:00:02+5:30
साधारणतः १८ वर्षांपूर्वीपर्यंत अजिंठा लेण्यांच्या पायथ्यापर्यंत सर्वसामान्य पर्यटकांची वाहने जात होती. मात्र, तेथे प्रदूषण पातळी वाढल्याने या लेण्यांपर्यंत वाहनांचा प्रवास थांबविण्यात आला.

अजिंठा लेण्यांत ई-वाहनेच ‘डिस्चार्ज’; एसटीवर मदार, पेंटिंग सुरक्षित राहणार तरी कशी?
छत्रपती संभाजीनगर : मोठा गाजावाजा करून अजिंठा लेण्यांत पर्यटकांच्या सुविधेसाठी ई-वाहने सुरू करण्यात आली; परंतु ही वाहने पर्यटकांचा भारही सहन करू शकत नव्हती. शिवाय मध्येच बंद पडत होती. परिणामी, ही ई-वाहने बंद करण्याची नामुष्की ओढवली असून, पर्यटकांची वाहतूक एसटी महामंडळाच्या डिझेल बसमधून होत आहे. त्यामुळे लेण्यांतील पेंटिंग सुरक्षित राहणार तरी कशी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
साधारणतः १८ वर्षांपूर्वीपर्यंत अजिंठा लेण्यांच्या पायथ्यापर्यंत सर्वसामान्य पर्यटकांची वाहने जात होती. मात्र, तेथे प्रदूषण पातळी वाढल्याने या लेण्यांपर्यंत वाहनांचा प्रवास थांबविण्यात आला. अजिंठा टी पॉइंट येथून पर्यटकांना एसटी बसने लेण्यांकडे नेले जाते; परंतु यांतील काही बसगाड्याही धूर ओकतात. त्यामुळे लेण्यांतील चित्रांवर परिणाम होण्याची चिंता पर्यटकांकडून व्यक्त करण्यात येते. प्रदूषण कमी होऊन पेंटिंग सुरक्षित राहावीत, या दृष्टीने पर्यटन संचालनालयाकडून या ठिकाणी १४ आसनी ई-वाहने सुरू करण्यात आली; परंतु ती काही दिवसांतच ही वाहने बंद पडली आहेत.
का बंद झाली ई-वाहने?
लेण्यांपर्यंतचा रस्ता काहीसा चढाचा आहे. त्यामुळे ई-वाहने पर्यटकांचा भार घेऊ शकत नव्हती. शिवाय खड्डेमय रस्त्यामुळेही त्यात भर पडत होती. ही वाहने अचानक बंद पडत होती. त्यामुळे ती बंद करून लवकरच नवीन वाहने आणली जाणार आहेत.
जुन्या बस बदला
अजिंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची ने-आण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या जुन्या, खराब झालेल्या बस बदलून नव्या इलेक्ट्रिक बसेस चालविण्यात याव्यात. बसस्टॉपपासून लेण्यांपर्यंतचा रस्ता दुरुस्त करावा.
- राहुलदेव निकम, अध्यक्ष, अजिंठा गाइड असोसिएशन
लवकरच २२ आसनी ई-बस
अजिंठा लेण्यांत लवकरच २२ आसनी ई-बस येतील. टप्प्याटप्प्यांत एकूण २० ई-वाहने येतील. कमीत कमी वेळेत पर्यटकांची चढ-उतार होईल, अशी या ई-वाहनांची रचना असेल. ही ई-वाहने आल्यानंतर डिसेंबर अथवा जानेवारीपर्यंत लेण्यांसाठी एसटी बसेस धावणे पूर्णपणे थांबेल.
- विजय जाधव, प्रादेशिक उपसंचालक, पर्यटन संचालनालय