तंत्रज्ञांअभावी संगणक धूळ खात
By Admin | Updated: June 17, 2014 01:11 IST2014-06-17T00:20:27+5:302014-06-17T01:11:10+5:30
विलास भोसले , पाटोदा प्रशासकीय कामांना गती यावी, सामान्यांची कामे वेळेवर व्हावीत यासाठी लाखो रुपये खर्च करून संगणकासह इतर साहित्य खरेदी करण्यात येत आहे.

तंत्रज्ञांअभावी संगणक धूळ खात
विलास भोसले , पाटोदा
प्रशासकीय कामांना गती यावी, सामान्यांची कामे वेळेवर व्हावीत यासाठी लाखो रुपये खर्च करून संगणकासह इतर साहित्य खरेदी करण्यात येत आहे. असे असले तरी संगणकासह इतर उपकरणे चालविण्यास तज्ज्ञ नसल्याने ते साहित्य धूळ खात पडले आहे. या साहित्याची ‘चणे आहेत पण दात नाहीत’ अशी अवस्था झाल्याचे दिसून येत आहे.
प्रशासकीय कामांना गती यावी, विकासासह इतर कामे जलदगतीने व्हावीत, दफ्तर दिरंगाई होऊ नये, यासाठी ग्रामपंचायत पासून राज्य स्तरावरील सर्वच कार्यालयांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. यासाठी ‘ई-प्रशासन’ ही व्यवस्था राबविण्यात येत आहे. सामान्यांना लालफितीची फटका बसू नये, यासाठी संगणकासह इतर खरेदीवर लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. असे असले तरी याचा उपयोग सामान्यांसाठी होत असल्याचे दिसून येत नाहीत.
तालुक्यातील पंचायत समिती व तहसील कार्यालयास अनेक संगणक देण्यात आलेले आहेत. पंचायत समितीतील ‘संग्राम’ कक्षामधून रोहयोचे काम चालते. येते कंत्राटी तज्ज्ञ असल्यान काही प्रमाणात काम केले जाते. मात्र, तहसीलमध्ये या संगणकाचा वापर पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. येथे तज्ज्ञच नसल्याने संगणक धूळ खात आहेत.
येथील तहसीलमधून ‘ई-डिस्ट्रीक्ट’ नावाने प्रकल्प सुरू आहे. यासाठी संगणकासह इतर सर्व साहित्य पुरविण्यात आलेले आहे. वेगवेगळे प्रमाणपत्र ‘आॅनलाईन’ देण्याचा या मागील उद्देश आहे. असे असले तरी येथे तज्ज्ञ व्यक्ती नसल्याने शासनाच्या उद्देशालाच खो बसत आहे. पर्यायाने सामान्यांची कामेही वेळेवर होत असल्याचे दिसून येत नाही. शिधापत्रीका वितरणासाठी येथे एक प्रकल्प राबविला जातो. याप्रकल्पाची अवस्थाही फारशी समाधानकारक नाही. खाजगी तंत्रज्ञ लावून कामे केली जात आहेत. प्रत्यक्षात या प्रकल्पाच्या लिंक सपोर्ट करीत नसल्याने कामाला अनेकदा खीळ बसते. या संदर्भात नायब तहसीलदार गणेश जाधव म्हणाले, त्रुटींसंदभात वरिष्ठांना कळविले आहे. वेगाने काम करण्याचे नियोजन करू.
खाजगी तंत्रज्ञांची घेतली जातेय मदत
पंचायत समिती, तहसील कार्यालय येथे तंत्रज्ञ नसल्याने संगणक चालविण्यास खाजगी तंत्रज्ञांची घेतली जातेय मदत.
संगणक चालविण्यास तंत्रज्ञ नसल्याने कामांना येईना गती.
‘आॅनलाईन’ प्रमाणपत्र मिळण्यासही येतात अनेक अडचणी.