सोशल मीडियावरील अपप्रचारामुळे भाजप पदाधिकाऱ्यांची चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 15:34 IST2018-06-16T15:32:32+5:302018-06-16T15:34:56+5:30
भाजप सरकारच्या राजवटीत सर्वसामान्यांचा भ्रमनिरास झाला, महागाईने अनेक विक्रम मोडले, हेच का अच्छे दिन? यासारख्या सोशल मीडियावरील अनेक विडंबनात्मक पोस्ट आणि चावडीवरील अपप्रचारामुळे भाजप पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

सोशल मीडियावरील अपप्रचारामुळे भाजप पदाधिकाऱ्यांची चिंता वाढली
- विजय सरवदे
औरंगाबाद : भाजप सरकारच्या राजवटीत सर्वसामान्यांचा भ्रमनिरास झाला, महागाईने अनेक विक्रम मोडले, हेच का अच्छे दिन? यासारख्या सोशल मीडियावरील अनेक विडंबनात्मक पोस्ट आणि चावडीवरील अपप्रचारामुळे भाजप पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे आता स्वस्थ बसू नका. लोकांमध्ये जाऊन वेगवेगळ्या सरकारी योजनांचा प्रचार करा. लाभार्थ्यांमध्ये जाऊन, तुम्हाला जे काही मिळाले आहे, ते भाजप सरकारमुळेच, अशी त्यांना आठवण करून द्या, या व अशा वेगवेगळ्या टिप्स भाजपच्या नेत्यांनी काल ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पक्षाच्या सर्वच आघाड्यांच्या सदस्य-पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
सन २०१४ ची लोकसभा- विधानसभेची निवडणूक असेल किंवा त्यानंतर येणाऱ्या गावपातळीवरील साऱ्याच निवडणुकांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपने विजयाचे सर्व विक्रम मोडले आहेत. अलीकडच्या काळात मात्र, त्याच सोशल मीडियाने भाजप नेत्यांची झोप मोडली आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत काल गुरुवारी जिल्ह्यातील सर्व भाजपचे जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, भाजपच्या जिल्हा, तालुका, शहर कार्यकारिणी तसेच व सर्वच आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक आयोजित झाली.
या बैठकीत भाजपचा अपप्रचार रोखण्यासाठी सज्ज व्हा, असे सांगून योजनांनिहाय याद्या हस्तगत करा. गाव व तालुकानिहाय लाभार्थ्यांच्या याद्या तयार करा, ग्रामसभांमध्ये त्याचे वाचन करा, लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटी घ्या आणि त्यांना जाणीव करून द्या की, जे काही तुम्हाला मिळाले आहे, ते भाजप सरकारमुळेच.
काही सदस्यांनी कामे होत नसल्याचा सूर आळवला. तेव्हा आपल्याला काय मिळाले किंवा नाही, याचा विचार न करता बुथनिहाय संपर्क अभियान यशस्वी करा. भाजपचा अपप्रचार रोखण्यावर नेटाने भर द्या. आगामी निवडणुकीत बहुमताने भाजपचे सरकार सत्तेत आले, तर तुमची कामे होतील, अशा कानपिचक्याही या बैठकीत दिल्या.
बैठकीत करण्यात आलेले उपदेश असे...
भाजपच्या राजवटीत शेतकरी देशोधडीला लागला, असा अपप्रचार केला जात आहे. त्यासाठी पीकविमा, पीककर्ज, बोंडअळीमुळे देण्यात आलेली नुकसानभरपाई आदींच्या याद्या हस्तगत करा. गावनिहाय लाभार्थ्यांच्या याद्या तयार करा. त्यानंतर गावांमध्ये दवंडी लावून ग्रामसभा बोलवा. लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावांच्या यादीचे जाहीरपणे वाचन करा. केंद्र तसेच राज्यात भाजप सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळात तुम्हाला हा लाभ मिळाल्याचे त्यांना ठासून सांगा. याशिवाय, संजय गांधी निराधार योजना, मोफत गॅस, मुद्रा लोन, शेततळे, नालाबंडिंग, चर खोदणी, विविध घरकुल योजना, अपंगांच्या विविध योजना, अशा विविध योजनांच्या लाभार्थ्यांना भेटा. त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करा. भाजप सरकारमुळेच तुम्हाला लाभ मिळू शकला, हे त्यांना समजावून सांगा.