ग्रा.पं.च्या दुर्लक्षामुळे नळ योजना रखडली

By Admin | Updated: September 30, 2014 01:27 IST2014-09-29T23:49:50+5:302014-09-30T01:27:12+5:30

पिंपरखेड : वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे २००७ साली जलस्वराज्य योजनेअंतर्गत नळ योजना मंजूर झाली होती. मात्र सात वर्षाचा कालावधी उलटूनही केवळ

Due to the prevention of Gram pumps, the taps were kept vacant | ग्रा.पं.च्या दुर्लक्षामुळे नळ योजना रखडली

ग्रा.पं.च्या दुर्लक्षामुळे नळ योजना रखडली


पिंपरखेड : वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे २००७ साली जलस्वराज्य योजनेअंतर्गत नळ योजना मंजूर झाली होती. मात्र सात वर्षाचा कालावधी उलटूनही केवळ ग्रा.पं.च्या उदासिनतेमुळे आणि सरपंचांच्या दुर्लक्षामुळे ही योजना अद्यापही रखडलेलीच आहे. ग्रामस्थांनीही या योजनेबाबत साधी विचारपूसही केलेली नाही. या नळ योजनेत पाणीपुरवठा समितीने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पिंपरखेड ग्रामस्थांनी केला आहे.
२००७ साली ३६ लाख रुपये खर्चाची पिंपरखेडला नळ योजना मंजूर झाली. या योजनेअंतर्गत माजलगावच्या सिंदफणा धरणावरून गावाला पाणी पुरवठा करण्याचे नियोजन होते. त्या प्रमाणे माजलगाव धरणातून पाईपलाईन करून गावामध्ये पाणीही आणले. विहिरीचे कामही पूर्ण झाले. मात्र ग्रा.पं.च्या दुर्लक्षामुळे अद्यापही गावात टाकीचे बांधकाम झालेले नाही. लाखो रुपयांची जलस्वराज्य योजना स्वत:च्या खिशात घालण्याचे काम येथील पाणीपुरवठा समिती करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.
सरपंच अशोक निपटे यांना विचारले असता आचारसंहिता संपताच काम पूर्ण करू असे म्हणत हात झटकले. वास्तविक पाहता तत्कालिन सरपंचाने ही नळ योजना पूर्ण केली नाही याची साधी चौकशी करण्याची तसदीही सरपंच निपटे यांनी घेतली नाही.त्यामुळे येथील पाणीपुरवठा विभागाशी सरपंचासह गावातील काही लोकांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप होत आहे.
ग्रामस्थही या नळ योजनेबाबत उदासिन असल्याचे दिसून येत आहेत. या नळ योजनेबाबत केवळ पंचायत समितीला तक्रार देण्यात आली होती. मात्र यावर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांचाही यामध्ये हस्तक्षेप आहे की काय? असा सवाल ग्रामस्थांमधून केला जात आहे.
याबाबत पाणीपुरवठा विभागाचे सचिव भागवत निपटे म्हणाले, या योजनेचे दोन हप्ते अद्याप बाकी आहेत. ते पैसे आल्यास राहिलेले काम पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले. या पाणीपुरवठा विभागाला मागील पाच वर्षापासून अद्यापर्यंत या योजनेचे पैसे मिळालेच नाहीत का? याबाबत संशय व्यक्त होत आहे.
माजलगाव धरणावर पाणीपुरवठ्यासाठी खोदण्यात आलेल्या विहिरीचे काम पूर्ण झाले असून त्यामध्ये मोटारही बसविण्यात आली आहे. पाईपलाईनद्वारे गावापर्यंत पाणीही आलेले आहे. गावात पाणी येऊनही ग्रा.पं.च्या उदासिनतेमुळे टाकीचे बांधकाम रखडलेलेच आहे. तसेच नळ कनेक्शनही जोडलेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांना कोसो मैल दूर भटकंती करावी लागत आहे. गटविकास अधिकारी बी.डी. राऊत म्हणाले, हे काम खूप वर्षांपूर्वीचे आहे. त्याबद्दल मला काही सांगता येणार नाही. अधिकाऱ्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावरही संशय व्यक्त केला जात आहे. नळ योजना सुरू करून पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Due to the prevention of Gram pumps, the taps were kept vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.