रेल्वेतील जागेअभावी परीक्षेवर पाणी
By Admin | Updated: May 12, 2014 00:00 IST2014-05-11T23:53:18+5:302014-05-12T00:00:00+5:30
परभणी : पोस्ट कार्यालयाच्या पद भरती संदर्भात औरंगाबाद येथे होणार्या परीक्षेसाठी निघालेल्या शेकडो परीक्षार्थ्यांना परभणी स्थानकावरुन रेल्वेमध्ये जागा मिळाली नसल्याने परीक्षेवर पाणी सोडावे लागले.

रेल्वेतील जागेअभावी परीक्षेवर पाणी
परभणी : पोस्ट कार्यालयाच्या पद भरती संदर्भात औरंगाबाद येथे होणार्या परीक्षेसाठी निघालेल्या शेकडो परीक्षार्थ्यांना परभणी स्थानकावरुन रेल्वेमध्ये जागा मिळाली नसल्याने परीक्षेवर पाणी सोडावे लागले. रविवारी पोस्ट कार्यालयातील पदभरतीची लेखी परीक्षा होती. मराठवाड्यातील उमेदवारांना औरंगाबाद केंद्र आले होते. या परीक्षेसाठी परभणीसह सेलू, मानवत येथून हजारो परीक्षार्थ्यांनी मराठवाडा एक्स्प्रेसने औरंगाबाद येथे परीक्षेच्या वेळेपूर्वी पोहोचण्याचे नियोजन केले होते. परंतु, परीक्षार्थ्यांची संख्या मोठी असल्याने रविवारी सकाळी मराठवाडा एक्स्प्रेस रेल्वेला परीक्षार्थ्यांची गर्दी झाली होती. सकाळी ७.५० वाजता मराठवाडा एक्स्प्रेस परभणी स्थानकावर दाखल झाली. परीक्षार्थ्यांनी तिकीट काढून रेल्वेची वाट पाहिली. परंतु, ही रेल्वे ज्यावेळी परभणीत दाखल झाली तेव्हा नांदेड येथूनच खचाखच भरलेली होती. रेल्वेमध्ये पाय ठेवण्यासही जागा शिल्लक नव्हती. परीक्षार्थ्यांची संख्या मोठी असल्याने अनेक परीक्षार्थ्यांना रेल्वेमध्ये जागाच मिळाली नाही. सकाळी ८.१० वाजता ही रेल्वे औरंगाबादकडे रवाना झाली. परंतु, या दरम्यानच्या काळात जागा मिळविण्यासाठी परीक्षार्थ्यांची मोठी धावपळ झाली. अखेर अनेक परीक्षार्थ्यांना परीक्षास्थळी पोहोचता आले नाही. (प्रतिनिधी)