इंग्रजीच्या भीतीने शिकवणीला गर्दी
By Admin | Updated: July 4, 2014 00:20 IST2014-07-03T23:48:28+5:302014-07-04T00:20:58+5:30
हिंगोली : करिअरसाठी कुठल्याही क्षेत्रात पाऊल ठेवले, तरी इंग्रजी भाषेला महत्त्व दिले जाते. त्यामुळे शाळेच्या पहिल्या वर्गापासून मुलांना इंग्रजीचे धडे मिळावेत, असा पालकांचा अट्टहास आता वाढत चालला आहे.

इंग्रजीच्या भीतीने शिकवणीला गर्दी
हिंगोली : करिअरसाठी कुठल्याही क्षेत्रात पाऊल ठेवले, तरी इंग्रजी भाषेला महत्त्व दिले जाते. त्यामुळे शाळेच्या पहिल्या वर्गापासून मुलांना इंग्रजीचे धडे मिळावेत, असा पालकांचा अट्टहास आता वाढत चालला आहे. त्यातूनच खासगी शिकवण्यांनाही गर्दी वाढत असल्याचे ‘लोकमत’च्या सर्वेक्षणातून दिसून येते. मुले इंग्रजी माध्यमात शिक्षण घेत असल्यानेच शिकवणी लावल्याचे अनेक पालकांनी म्हटले आहे. तसेच, ‘केजी’पासूनच मुलांना शिकवणीला पाठविले जात असल्याचेही सर्वेक्षणात आढळून आले.
आपल्या मुलांना अभ्यासाची सवय लागावी, किंबहुना आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहावे, यासाठी त्याला जास्तीत-जास्त पुरक शिक्षण दिले जाते. मग या पुरक शिक्षणासाठी वेगवेगळे पर्याय अवलंबले जातात. योग्य शाळा लावणे, घरी वेळच्या-वेळी अभ्यास घेणे, त्याचबरोबर पाल्यास योग्य शिकवणी लावणे, याचे प्रमाण वाढत आहे. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे केजीपासूनच मुलांना शिकवणीला पाठविले जाते.
मुले इंग्रजी माध्यामात शिकत असल्याने शिकवणी लावत असल्याचे अनेक पालकांचे म्हणणे आहे. सर्वेक्षणानुसार केजी ते इयत्ता चौथीपर्यंत शिकवणी लावण्याचे हे प्रमाण ४० टक्के आहे.
साधारणत: एवढेच म्हणजे ३६ टक्के आठवी ते दहावीतील मुले शिकवणीला जातात. इंग्रजी माध्यमामुळे शिकवणी लावली असल्याचे तब्बल ७५ टक्के पालकांनी सांगितले आहे.
बदलत्या अभ्यासक्रमामुळे मुलांना शिकवणी लावणे गरजचे झाले आहे. पुढच्या वर्गात जाण्याबरोबरच त्यांचा अभ्यासही वाढत जातो.
आठवी व नववी हा दहावीचा पाया मानला जातो म्हणून शिकवणीची गरज पडते. पण, ज्युनियर-सिनियर के .जी. पासूनच मुलांनाही शिकवणी लावण्याचे प्रमाण मोठे असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट होते. (प्रतिनिधी)
खासगी शिकवण्यांकडे वाढला कल
या सर्वेक्षणात शाळेतील शिक्षकच शिकवणी घेतात का? असा प्रश्न केला असता केवळ १५ टक्के विद्यार्थ्यांनी होय, असे उत्तर दिले. ८५ टक्के विद्यार्थ्यांनी नाही, असे उत्तर दिले. त्यामुळे शाळेबाहेर विविध खासगी शिकविण्या सुरू केलेल्यांनाच विद्यार्थ्यांकडून अधिक पसंती दिली जात असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. खासगी शिकवणीचा हा बाजार चांगलाच वाढला आहे.