सर्वच पक्षांच्या स्वबळामुळे ‘दोस्त-दोस्त ना रहा’
By Admin | Updated: October 3, 2014 00:32 IST2014-10-03T00:26:39+5:302014-10-03T00:32:29+5:30
कळंब : कळंब-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय पक्षांमध्ये ‘दोस्त-दोस्त ना रहा’ असे वातावरण आहे. त्यामुळे आगामी काळात प्रचाराचे मुद्दे काय राहतील

सर्वच पक्षांच्या स्वबळामुळे ‘दोस्त-दोस्त ना रहा’
कळंब : कळंब-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय पक्षांमध्ये ‘दोस्त-दोस्त ना रहा’ असे वातावरण आहे. त्यामुळे आगामी काळात प्रचाराचे मुद्दे काय राहतील आणि कोण कोणाला टार्गेट करणार? हा उत्सुकतेचा विषय राहणार आहे.
या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध सेना-भाजप व काँग्रेस अशी अघोषिम युती असायची. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत हे तीनही प्रमुख पक्ष राष्ट्रवादीच्या विरोधात एकत्रित येत असत. या विधानसभा निवडणुकीत ही मैत्री फुटली आहे. राष्ट्रवादीविरुद्ध तिघांनीही सवतासुभा निर्माण करुन स्वतंत्र उमेदवार दिल्याने आता हे तिघे प्रचारादरम्यान कोणाला टार्गेट करणार, याबाबत राजकीय वर्तुळाबरोबरच मतदारांमध्ये उत्सुकता आहे.
राष्ट्रवादीने निवडणुकीच्या आधीपासूनच तेरणा कारखान्याचा विषय प्रचारासाठी ताणून धरला आहे. तेरणाच्या सभासदांचा १०० रु. चा शेवटचा हप्ता मिळाला नाही, दोन हंगामापासून कारखान्याचे गाळप बंद आहे, कामगारांच्या पगारी नाहीत तसेच काही व्यवहारावरुनही राष्ट्रवादीने सेनेला चांगलेच घेरले आहे. या मुद्यावरुन शेतकरी, कामगारांमध्ये असंतोष आहे. विशेषत: तेरणा पट्ट्यात या मुद्यावरुन राष्ट्रवादीला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे तेरणाचा मुद्दा तसेच राणाजगजितसिंह पाटील यांच्या मंत्रीपदाच्या काळातील तालुक्यातील विकास कामांचा मुद्दाही राष्ट्रवादीने प्रचारामध्ये समाविष्ट केला आहे.
काँग्रेस पक्षाचा अजून प्रत्यक्ष प्रचाराचा शुभारंभ झालेला नाही. परंतु हा पक्ष आघाडी सरकारने केलेल्या कामांच्या मुद्यावर मतदान मागणार असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. शिवसेना हा या भागात न.प., पं.स. मध्ये मित्रपक्ष असल्याने शिवसेनेवर टिका करण्याची भूमिका काँग्रेस घेणार का? याकडे भाजपा व राष्ट्रवादीचे लक्ष राहणार आहे. काँग्रेसने सेनेवर अथवा सेनेने काँग्रेसवर टिका नाही केली तर राष्ट्रवादीला हा आयता प्रचाराचा मुद्दा मिळणार असून, काँग्रेसकडे जाणारी धर्मनिरपेक्ष व पारंपारीक मते आपल्याकडे खेचता येणार आहेत.
भाजपाचे उमेदवार संजय पाटील दुधगावकर यांनी जि.प. उपाध्यक्षपदाच्या काळात केलेल्या मतदारसंघातील कामांच्या बळावर निवडणूक प्रचार यंत्रणा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारची कामगिरी हा मुद्दाही भाजपाच्या प्रचारात राहणार आहे. दुधगावकर यांनी जि.प. उपाध्यक्षपदाच्या काळामध्ये वाढविलेला जनसंपर्कही त्यांना प्रचारासाठी कामाचा ठरणार आहे. त्यांच्या प्रचारामध्ये राष्ट्रवादी व सेना हेच टिकेसाठी मुख्य टार्गेट राहणार आहेत.
सेनेकडून राष्ट्रवादी हाच प्रचाराचा विषय राहणार आहे. डॉ. पद्मसिंह पाटील व राणाजगजितसिंह पाटील यांच्या ३५ वर्षाच्या कारभाराचा जुनाच मुद्दा या निवडणुकीत सेनेकडून मुख्य मुद्दा असण्याची शक्यता आहे. सेनेकडून काँग्रेस, भाजपा व जुन्या मित्रांवर काय टिका होते? यावरही प्रचाराची रंगत ठरणार आहे. त्यामुळे आगामी १०-१२ दिवस आरोप-प्रत्यारोपाने मतदारसंघ ढवळून निघण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)