अवकाळी पावसाने जिल्ह्यास झोडपले
By Admin | Updated: January 2, 2015 00:44 IST2015-01-02T00:33:20+5:302015-01-02T00:44:35+5:30
जालना : गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपले असून अगोदरच दुष्काळाच्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा कापूसही भिजला आहे

अवकाळी पावसाने जिल्ह्यास झोडपले
जालना : गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपले असून अगोदरच दुष्काळाच्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा कापूसही भिजला आहे. या पावसामुळे ज्वारीचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात असून काही भागात पावसामुळे ऊस तोडणीचे कामही बंद पडले आहे.
बुधवारी दुपारनंतर जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस झाला. कमी-अधिक प्रमाणात रात्रभर हा पाऊस सुरू होता. गुरूवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सूर्यदर्शन दुपारी १२ वाजता झाले. जालना शहरासह परिसरात आज रात्री ८ च्या सुमारास जोरदार पाऊस झाला. काही कॉलनी वसाहतींमध्ये पावसामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत. पावसामुळे हवेत मोठा गारवा निर्माण झाल्याने अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. शासकीय कार्यालयांमध्येही अधिकारी, कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त बाहेरून ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या अगदी बोटावर मोजण्याएवढी होती.
बदनापूर तालुक्यात बुधवारी दुपारनंतर व गुरूवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. सेलगाव, केळीगव्हाण, भराडखेडा, रोषणगाव, काजळा, सायगाव, डोंगरगाव, नानेगाव, बाजारवाहेगाव, दाभाडी, चिखली, मेव्हणा, विल्हाडी, सोमठाणा, गेवराई बाजार आदी भागात जोरदार पाऊस झाला. दोन दिवसांपासुन बदनापूर येथे अवकाळी पाऊस सुरू असुन पावसामुळे या खरेदी केलेल्या कापसापैकी हजारो क्विंटल कापुस पुरेशा ताडपत्र्यांअभावी भिजला आहे या पावसामुळे येथील सीसीआयची कापूस खरेदी तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
अंबड तालुक्यात शहरासह सोनक पिंपळगाव, शहागड, वडीगोद्री, गोंदी, साष्टपिंपळगाव, तळेगाव, पारनेर, सुखापुरी, रवना पराडा, पावसेपांगरी, वाघलगाव, रोहिलागड आदी भागात जोरदार पाऊस झाला. पावसाने दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले होते.
या पावसाने गव्हाच्या पिकांना पाणी देणे बंद झाले असले तरी जवारीचे पीक सध्या चांगले असून, या ढगाळ वातावरणामुळे ज्वारीच्या कणसात अळ्या होऊ शकतात. तसेच या जोरदार पावसामुळे साखर कारखान्यांसाठी सुरू असलेली ऊस तोडणी शेतात पाणी साचल्यामुळे बंद झाली आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर उभी शाळू ज्वारी जमिनीवर पडून मोठे नुकसान होऊ शकते, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
घनसावंगी तालुक्यात घनसावंगीसह तीर्थपुरी, मंगरूळ, कोठी, वडीरामसगाव, रांजणी, पिंपरखेड, भोगगाव, कुंभार पिंपळगाव, खडका, खालापुरी, कंडारी, बानेगाव, रामसगाव, भायगव्हाण, बाचेगाव, जोगलादेवी, भणंगजळगाव, देवहिवरा, तनवाडी इत्यादी भागातही जोरदार पाऊस झाला. शेतात पाणी साचल्याने अनेक ठिकाणी ऊस तोडणी करण्याचे काम बंद पडले.
भोकरदन तालुक्यात बुधवारपासून दोनवेळा जोरदार पाऊस झाला. हसनाबाद, राजूर, तळेगाव, जवखेडा, सावखेडा, विटा, पिंपरी, एकेफळ, केदारखेडा, जवखेडा ठोंबरे, तळणी, बानेगाव, गोषेगाव, शिरसगाव इंगळे, आलापूर, दानापूर, आन्वा, हिसोडा, धावडा, पारध, सिपोरा बाजार इत्यादी भागात पाऊस झाला. या पावसाने गहू, हरभरा, मका, करडी या पिकांना मोठ्या प्रमाणावर जीवदान मिळाले. मात्र ज्वारीचे भरून आलेले दाणे काळे पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
उभ्या जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र काही अंशी सुटला आहे.
जाफराबाद तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. टेंभूर्णी, अकोला देव, काळेगाव, वरूड बुद्रूक, भारज, खासगाव, माहोरा, बुटखेडा इत्यादी भागात पाऊस झाला. या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोसंबी, चिकू, डाळिंबच्या झाडांना त्याचा तडाखा बसला आहे. तालुक्यात काही दिवसांपूर्वीच झालेल्या रस्त्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
परतूर तालुक्यात काही भागात जोरदार पाऊस झाला. सुसाट वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. पारडगाव, रवना, वाटूर, आष्टी, आंबा, सातोना इत्यादी भागालाही अवकाळी पावसाने झोडपले.
मंठा तालुक्यात तळणी, गोसावी पांगरी, उस्वद, दहिफळ खंदारे, हेलस, जयपूर इत्यादी भागात पाऊस झाला. (प्रतिनिधी)४
जिल्ह्यात बुधवारपासून सर्वत्र पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. गुरूवारी अनेक ठिकाणी सूर्यदर्शन दुपारनंतर काही काळ झाले. पावसामुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थितीही कमी होती.
४जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी ७.०६ मि.मी. पावसाची नोंद आहे. सर्वाधिक पाऊस जाफराबाद तर सर्वात कमी पाऊस मंठा तालुक्यात झाला. जालना ८.१२, बदनापूर २.८०, भोकरदन १०.८७, जाफराबाद १३.२०, परतूर ६.२०, मंठा २.५०, अंबड ४.८५ आणि अंबड तालुक्यात ८ मि.मी. पाऊस झाली आहे.