पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले
By Admin | Updated: July 6, 2016 23:55 IST2016-07-06T23:24:21+5:302016-07-06T23:55:53+5:30
बीड : यंदाच्या हंगामात प्रथमच मंगळावारी सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रखडलेल्या पेरणी कामांना वेग आला आहे तर काही ठिकाणी पिकांच्या मशागतीची कामे सुरू आहेत.

पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले
बीड : यंदाच्या हंगामात प्रथमच मंगळावारी सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रखडलेल्या पेरणी कामांना वेग आला आहे तर काही ठिकाणी पिकांच्या मशागतीची कामे सुरू आहेत. तब्बल तीन आठवड्यानंतर झालेल्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. खरीपाचा पेरा १५ जुलै पर्यंत केला जातो. पावसाने ओढ दिल्याने जून अखेपर्यंत खरीपाच्या क्षेत्रापैकी ७५ टक्केच पेरण्या झाल्या होत्या. पेरणीपासून पाऊस गायब झाल्याने पिके सुकू लागली होती, तर इतर तालुक्यांत पेरण्या लांबणीवर पडल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला होता. पेरणी करूनही पिकांची वाढ खुंटली होती. उशिरा का होईने, मंगळवारी जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली होती. केवळ एका दिवसात २१ मि.मी. पाऊस झाल्याने खरीपातील पिकांना जीवदान मिळाले आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार अद्यापपर्यंत जिल्ह्यात पेरण्या झाल्या आहेत. जुलैअखेरपर्यंत पेरण्या पूर्ण होणार असल्याचा अंदाज कृषी विकास अधिकारी डी. बी. बिटके यांनी व्यक्त केला आहे. हंगामाच्या सुरूवातीपासून पाठ फिरवलेल्या अंबाजोगाई तालुक्यात मंगळवारी सर्वाधिक ३३.६ मि.मी. पाऊस झाला. या पावसामुळे पिकांच्या मशागतीबरोबर रखडलेल्या कामांना वेग मिळाला आहे. बुधवारपासून शेतकऱ्यांनी डुब्याच्या सहायाने मशागती कामाला सुरूवात केल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)