पावसाअभावी पेरण्या लांबल्या
By Admin | Updated: June 22, 2014 00:09 IST2014-06-21T23:27:49+5:302014-06-22T00:09:49+5:30
पारध : मृग नक्षत्र संपले तरी पावसाचे आगमन झालेले नाही. परिणामी, परिसरातील पेरण्या व कापूस लागवड लांबल्याने शेतकरीवर्ग चिंंतातूर झाला आहे.

पावसाअभावी पेरण्या लांबल्या
पारध : मृग नक्षत्र संपले तरी पावसाचे आगमन झालेले नाही. परिणामी, परिसरातील पेरण्या व कापूस लागवड लांबल्याने शेतकरीवर्ग चिंंतातूर झाला आहे.
मागील हंगामात अतिवृष्टी, गारपीट आणि सतत वाढणाऱ्या भारनियमनाने शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले. या हंगामात काहीतरी पदरी पडेल म्हणून शेतकऱ्यांनी मागील महिन्यात रखरखत्या उन्हाची पर्वा न करता शेताची मशागत केली. काही शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा आधार घेत मोठ्या प्रमाणात कपाशी व मिरचीची लागवडही केली. मात्र इथेही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. कारण पारध परिसरात पिंपळगाव रेणुकाई, सावंगी अवघडराव, हिसोडा, लेहा, शेलूद, पारध खुर्द, पद्मावती आदी ठिकाणी मिरचीवर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव झाला. या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी महागाची औषधी फवारुन ही मिरची टिकविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र, त्याचा उपयोग झाला नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी अक्षरश: हे मिरचीचे रोप उपटून फेकले. मिरची रोपांसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला. परत रोपे घेऊन मिरची लागवड करण्याची शेतकऱ्यांची परिस्थिती नक्कीच नाही.
ज्या शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केलेली आहे, ती सरकी सध्या कोवळी असून कशीबशी तग धरुन आहे. मात्र वीज कंपनीने येथेही घात केला. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी पुरता वैतागला आहे. त्यातच कंपनीने अचानक भारनियमन दोन तासांनी वाढविल्याने आता कपाशीचे झाडे जगवावी? कशी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.
मान्सून वेळेवर येईल म्हणून परिसरातील शेतकऱ्यांनी पीक कर्ज खाजगी सावकाराचे कर्ज दागिने विकून अथवा गहाण ठेवून मोलामहागाचे बियाणे खरेदी करुन घरात ठेवले आहे. मात्र आठवडा उलटून गेला तरी अद्याप मान्सूनचा पाऊस पडललेला नाही. (वार्ताहर)
शेतकऱ्यांना दुष्काळाची भीती
गारपीट व अतिवृष्टीने पुरत्या खचलेल्या शेतकऱ्यांची निसर्ग यंदाही चेष्टा करतो की काय, तसेच दोन वर्षापूर्वीच्या दुष्काळाची भीती शेतकरी वर्तवित आहे.