छत्रपती संभाजीनगरात रेल्वेच्या उच्च श्रेणी प्रतीक्षालयात मद्यपींचे ‘दो घूँट’; प्रवाशांना प्रचंड त्रास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 19:06 IST2025-08-04T19:05:43+5:302025-08-04T19:06:14+5:30
‘कोणीही यावे, कोणीही जावे’ची स्थिती, प्रवासी त्रस्त

छत्रपती संभाजीनगरात रेल्वेच्या उच्च श्रेणी प्रतीक्षालयात मद्यपींचे ‘दो घूँट’; प्रवाशांना प्रचंड त्रास
छत्रपती संभाजीनगर : रेल्वे स्टेशनवरील उच्च श्रेणी प्रतीक्षालयाची आजघडीला दुरवस्था झाली असून, ‘कोणीही यावे, कोणीही जावे’ अशी स्थिती आहे. परिणामी, ‘दो घूँट’ घेणारे मद्यपीही या प्रतीक्षालयाचा बिनधास्त वापर करीत असल्याची स्थिती आहे. याचा उच्च श्रेणीतील प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
रेल्वेस्टेशनवर जनरल वेटिंग हाॅल आणि उच्च श्रेणी प्रतीक्षालय आहे. रेल्वेची वाट पाहत प्लॅटफाॅर्मवर थांबण्याऐवजी या प्रतीक्षालयात थांबण्यासाठी दोन्ही श्रेणीतील प्रवाशांना स्वतंत्र प्रतीक्षालय आहेत. मात्र, आजघडीला उच्च श्रेणी प्रतीक्षालयाची अवस्था ‘जनरल’पेक्षाही वाईट झाली आहे. पूर्वी तिकीट तपासूनच उच्च श्रेणी प्रतीक्षालयात प्रवाशांना प्रवेश दिला जात असे. मात्र, आजघडीला या ठिकाणी तिकीट तपासण्यासाठी कोणताही कर्मचारी नसतो. त्यामुळे कोणीही अगदी सहजपणे या प्रतीक्षालयात ये-जा करतो. उच्च श्रेणीतील प्रतीक्षालयाच्या स्वच्छतागृहात जागोजागी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. दुसरीकडे जनरल वेटिंग हॉलमधील आसनांची देखभाल न झाल्यामुळे काही आसने तुटलेली आणि वापरासाठी अयोग्य अवस्थेत आहेत. यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही.
फरशा तुटलेल्या, श्वानांचा वावर
उच्च श्रेणी प्रतीक्षालयात भटक्या कुत्र्यांचा मुक्त वावर, प्रवाशांसाठी मोठा त्रासदायक ठरत आहे. विशेषत: लहान मुलांसह येणाऱ्या प्रवाशांना कुत्र्यांमुळे भीती वाटते असे दिसून आले आहे. येथील फरशाही जागोजागी तुटलेल्या आहेत.