टंचाईकडून दुष्काळाकडे...
By Admin | Updated: July 6, 2014 00:24 IST2014-07-05T23:56:37+5:302014-07-06T00:24:38+5:30
भूम : तालुक्यात पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम धोक्यात तर पाणीटंचाई उग्र रुप धारण करीत असून, तालुक्यात सध्याच्या परिस्थितीवरुन तालुका दुष्काळाकडे वाटचाल करीत आहे.

टंचाईकडून दुष्काळाकडे...
भूम : तालुक्यात पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम धोक्यात तर पाणीटंचाई उग्र रुप धारण करीत असून, तालुक्यात सध्याच्या परिस्थितीवरुन तालुका दुष्काळाकडे वाटचाल करीत आहे.
भूम तालुका हा डोंगराळ भाग असल्याने या भागात मोसमी शेती करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तर डोंगराळ भाग अधिक असल्याने आगाऊ चरावू कुरणामुळे या भागात दुग्ध व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून केला जातो. अशा परिस्थितीत तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता ९०६ मि.मी. सरासरी पाऊस अपेक्षित आहे. परंतु २०१० नंतर एकदाही पावसाने सरासरी गाठली नसल्याने शेती उद्योग अडचणीत असताना यंदा तर सुरुवातीपासूनच पावसाने पाठ फिरविल्याने तालुक्यात दुष्काळाची छाया गडद होत आहे.
मागील दोन-चार वर्षात अल्प पाऊस पडत गेल्याने पाणी टंचाई सातत्याने वाढत असून, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतुत तालुक्यात वालवड सर्कलमध्ये पाणीटंचाई कायम आहे. दरम्यान, यंदातरी जून महिन्यात चांगला पाऊस होईल या आशेवर शेतकरी सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरविल्याने खरेदी केलेले बी-बियाणे, खतांचा खर्च व्यर्थ जातो की काय अशी अवस्था आहे. बाजारपेठेत दुष्काळाचा परिणाम जाणवू लागला असून, आठवडी बाजारातही पावसाअभावी भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने भाजीपाला खरेदी करताना सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात पाणी टंचाई दिवसागणिक वाढत असून, टँकरसाठी दिवस दिवस रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे.
तीन-चार वर्षात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. मात्र यंदा तर पावसाअभावी तालुका दुष्काळाची वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात १९७२ साली दुष्काळग्रस्त परिस्थिती झाली होती. त्यानंतर आता धान्य साठा असला तरी हा दुष्काळ पाणीटंचाईच्या सावटाखाली जात आहे.
तालुक्यात जून २०१४ अखेर १०.३ हेक्टरवर ०.०३ टक्के फक्त पेरणी झाली आहे. गतवर्षी जुलै २०१३ अखेर १०५ टक्के म्हणजे ३२ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. यामुळे या तालुक्यात पशुधनाची संख्या १ लाख ६५ हजारावर आहे.
दरम्यान, पावसाने पाठ फिरविल्याने गतवर्षीच्या रबीच्या चाऱ्याची वादळी गारपिटीमुळे नुकसान झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला आहे. येत्या १५ दिवसात पाऊस झाला नाही तर पशुधनाचा सांभाळ करणे अवघड होवून याचा परिणाम दुग्ध व्यवसायावर होईल, असे चित्र सध्या दिसत आहे. (वार्ताहर)
२०१३ मध्ये झालेला पाऊस (जुन अखेर)
भूम १५५ मि.मी.,
माणकेश्वर ४९ मि.मी.,
वालवड ६० मि.मी.,
अंबी १५८ मि.मी.,
ईट १३४ मि.मी.
साडेसहा हजार हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या
वाशी : पावसाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप पावसाचा एक ठिपूसही न पडल्यामुळे तालुक्यातील साडेसहा हजार हेक्टरवरील खरिपाच्या रखडल्या आहेत. शेतकऱ्यांनी खरेदी केलेली महागडी खते, बी-बियाणे तशीच पडून असून, ती उपयोगात येतात की नाही, तसेच यावर्षी खरिपाची पेरणी होते की नाही, अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भेडसावू लागली असून, सद्यस्थितीत १० गावांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने टँकर चालू केले आहेत. याशिवाय १८ गावात २४ कूपनलिकांचे अधिग्रहणही करण्यात आले आहे.
खरिपाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या वाशी तालुक्यात मका, सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मुग ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. दरवर्षी शेतकरी पाळीपेरणी करून पंढरीच्या वारीस जाऊन परत आल्यानंतर अंतर्गत मशागतीच्या कामात व्यस्त राहत असे. मात्र, यावर्षी अद्याप पावसाने ओढ दिल्याने पेरणीही होऊ शकलेली नाही. तालुक्यातील ३० गावांमध्ये खरिपाची मोठ्या प्रमाणावर पेरणी होते तर २४ गावे रब्बी हंगामाची म्हणून ओळखली जातात. खरिपाच्या पेरणीसाठी यंत्राच्या व बैलबारदाण्याच्या साह्याने बळीराजाने काळ्याआईची मशागत पूर्ण केली. मात्र, सध्या दिवसभर सुसाट वारे व सायंकाळी निरभ्र आकाश, अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे.
दुकानात साठा पडून
शेतकऱ्यांना बी-बियाणे व खताची टंचाई भासू नये, यासाठी कृषी विभागाने व तालुक्यातील खत दुकानदारानी मोठ्या प्रमाणावर बियाणांची व खताची उपलब्धता केलेली आहे. मात्र बहुतांश दुकादाराच्या दुकानात बियाणांचा साठा अद्याप तसाच शिल्लक आहे. येथील तालुका कृषी अधिकारी गोपाळ शेरखाने यांना खरिपाच्या पेरणीविषयी विचारणा केली असता १५ जुलैपर्यंत पाऊस पडला तरच खरिपाची पेरणी होऊ शकेल, असे ते म्हणाले. (वार्ताहर)
शहरासह ग्रामीण भागातही झळा
परंडा : पावसाने हुलकवणी दिल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून, सीना-कोळेगावसह तालुक्यातील इतर छोटे- मोठे प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे परंडा शहरासह ग्रामीण भागातही पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शिवाय जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
तालुक्यातील पंचेवीस गावची तहान भागविणाऱ्या सीना-कोळेगाव धरणाने तळ गाठला आहे. याशिवाय तालुक्यातील चांदणी, साकत, खंडेश्वरवाडी प्रकल्पातही खडखडाट आहे. परंडा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खासापुरी प्रकल्पामध्ये केवळ आठ दिवस पुरेल इतका पाणी साठा आहे. त्यामुळे शहरवासियांनाही टंचाईची चिंता भेडसावत आहे.
पाणी समस्या निवारण्यासाठी प्रशासनाकडून युद्वपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे. याच अनुषंगाने तालुक्यातील कुक्कडगाव, आसू, मुगाव, मलकापूर, देवगाव (बु) या ५ ठिकाणी टॅकंरद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला असून, ताकमोडवाडी येथे विहीर अधिगृहण करण्यात आली आहे. याशिवाय खासगाव, रत्नापूर, धोत्री, खंडेश्वरवाडी, आवारपिपंरी, चिचंपुर (बु), शेळगाव, चिचंपूर (खु), आसू, पांढरेवाडी, देवगांव (खु), कात्राबाद, सोनारी, सरणवाडी, काटेवाडी, वडणेर, जवळा (नि), पाचवड, वाकडी, लोणी, खासगाव, कांदलगाव, भोत्रा या गावांत जलस्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यात ६० बोअर आणि २१ विहिरींचा समावेश आहे. (वार्ताहर)
शेतकऱ्यांना अजूनही नगदी पिकांची अपेक्षा
लोहारा : पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्या खोळंबल्या असून, १५ जुलैपर्यंत चांगला पाऊस झाला तरच खरीप हंगामातील नगदी पिके शेतकऱ्यांना घेता येतील, अन्यथा घेता येणार नाहीत. यामुळे शेतकरी आता तरी पाऊस पडेल या आशेने आभाळाकडे डोळे लावून बसल्याचे चित्र आहे.
लोहारा तालुक्यात मागील अनेक वर्षापासून पावसाळा सुरु झाल्यानंतर पाऊस कमी जास्त प्रमाणात झाला. पण यावर्षी पावसाळा सुरु होवून महिना झाला तरी पावसाचा पत्ताच नाही. त्यामुळे दरवर्षीपेक्षाही यंदाची परिस्थिती वेगळी असून, पाऊस नाहीच झाला तर तालुक्यात पाणी टंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तसेच रोजगाराचा प्रश्न गंभीर होणार आहे. पावसाने ओढ दिल्याने लोहारा शहरासह तालुक्यातील व्यापाऱ्यांवर मंदीचे सावट आले असून, लोक केवळ गरजेनुसार खरेदी करीत आहेत. यामुळे बाजारपेठेतही शुकशुकाट दिसत आहे.
दरम्यान, पाऊस लांबला असला तरी खरीप हंगामातील उडीद, मुग, सोयाबीन ही पिके १५ जुलैपर्यंत घेता येतील. त्यानंतर ३१ जुलैपर्यंत संकरीत ज्वारी, तूर, मका, बाजरी, भूईमुग ही पिके घेता येतील, असे सास्तूर मंडळ कृषी अधिकारी डी.पी. पाटील यांनी सांगितले.
बहुतांश शेती पाण्यावरच
लोहारा तालुक्यात सर्रास शेतीही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. माकणी निम्न तेरणा प्रकल्पाच्या पट्ट्यातील बोटावर मोजण्याइतकी गावे सोडली तर इतरत्र पाऊस पडला तरच शेती अशी परिस्थिती आहे. त्यात शुक्रवारी रिमझिम पावसाने हजेरी लावली. यात लोहारा ९ मि.मी., माकणी २८ मि.मी. तर जेवळी २३ मि.मी. इतकाच पाऊस झाला. यावर्षी पावसाने रिमझिमने शुक्रवारपासून सुरुवात केली असल्याने मोठा पाऊस पडेल अशी आशा आता शेतकऱ्यांबरोबर सर्वांनाच वाटत आहे.
शेती कामांना ब्रेक
यावर्षी अद्यापही पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे, खते खरेदी केले आहेत. पण सर्वसामान्य शेतकरी वर्ग पेरणीच्या वेळीच खरेदी करता येईल या आशेवर बसले आहेत. पण अजून पाऊसच नसल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. पाऊस नसल्याने शेतातील कामाला शंभर टक्के ब्रेक लागला. त्यात बांधकामाचे ही काम संथ गतीने सुरु असून, मोल मजुरी करुन आपला उदरनिर्वाह भागवणाऱ्या मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे शासनाने तालुक्यात बंद केलेली रोहयो कामे पुन्हा सुरु करुन शेतकरी, मजुरांच्या हाताला काम द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)
जनावरांसाठीच्या पाणी, चाऱ्याची चिंताही वाढली
कळंब : जवळपास ७० हजार हेक्टर एवढे खरीप हंगामाखालील लागवड क्षेत्र असलेल्या कळंब तालुक्यात अद्यापही मोसमी पावसाचे आगमन झाले नसल्याने विदारक स्थिती निर्माण झाली असून, दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेल्या या भागात खरीप हंगामाचे भवितव्य तर धोक्यातच आले आहे. शिवाय पशुधनाच्या पाण्याचा तसेच चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खरीप हंगामात कळंब तालुक्यातील मोठ्या प्रमाणात पिकांची लागवड केली जाते. जवळपास ७० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरिपाची पेरणी होत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अतिशय महत्त्वाचा आहे. या हंगामात या भागात सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, आदी पिके घेऊन या पिकांच्या उत्पादनावरच शेतकऱ्यांची संपूर्ण आर्थिक मदार आहे. असा हा महत्त्वपूर्ण हंगाम संपूर्णत: मोसमी पावसावर अवलंबून असताना मोसमी पावसाने शेतकऱ्यांची पुरती निराशा केली आहे.
तीन नक्षत्रे कोरडीठाक
मे महिन्याच्या उत्तरार्धात या भागात पावसाळ्यातील पहिल्या रोहिणी नक्षत्राच्या थोड्याबहुत सरी बरसत असतात. यानंतर मान्सूनच्या आगमनावेळी सुरु होणाऱ्या मृग नक्षत्रातील दमादर पावसावर या भागातील शेतकरी आपल्या चाड्यावर मुठ ठेवून काळ्या आईची ओटी भरत असतात. मृगातील समाधानकारक व पेरणीयोग्य पावसावर पेरणी केल्यानंतर येणाऱ्या आर्द्रा नक्षत्राच्या पावसावर पिकांची वाढ जोमात होत असते. परंतु या तिन्ही नक्षत्रात शेतकऱ्यांनी समाधान मानावे असा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे.
अनेक गावात पाण्याचा प्रश्न
तालुक्यातील पंधरा गावात पावसाळ्याच्या दिवसातही १९ टँकरद्वारे ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. याशिवाय ६४ ठिकाणी खाजगी जलस्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. एकूणच भूगर्भातील पाणीपातळी अल्प स्वरुपाच्या पर्जन्यमानामुळे न वाढल्याने व भूपृष्ठावरील जलसाठवण स्त्रोतामध्येही ठणठणाट असल्याने अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. उन्हाळ्यापेक्षा सद्यस्थितीत पाणीप्रश्न गडद होत चालला आहे. (वार्ताहर)