औरंगाबादमध्ये दिव्यांगाला हवाय वाहतूक परवाना; रिक्षा चालवून बनायचे आहे सक्षम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 19:10 IST2018-02-06T19:06:13+5:302018-02-06T19:10:04+5:30
रिक्षा चालविताना ब्रेक लावण्यासाठी केवळ उजव्या पायाचा उपयोग होतो. केवळ डाव्या पायाला अपंगत्व आहे. आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी रिक्षा चालविण्यासाठी लायसन्स पाहिजे; परंतु कागदपत्रांची पूर्तता करण्यात सहा महिन्यांपासून आरटीओ कार्यालयात चकरा मारण्याची वेळ एका दिव्यांगावर ओढावली आहे.

औरंगाबादमध्ये दिव्यांगाला हवाय वाहतूक परवाना; रिक्षा चालवून बनायचे आहे सक्षम
औरंगाबाद : रिक्षा चालविताना ब्रेक लावण्यासाठी केवळ उजव्या पायाचा उपयोग होतो. केवळ डाव्या पायाला अपंगत्व आहे. आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी रिक्षा चालविण्यासाठी लायसन्स पाहिजे; परंतु कागदपत्रांची पूर्तता करण्यात सहा महिन्यांपासून आरटीओ कार्यालयात चकरा मारण्याची वेळ एका दिव्यांगावर ओढावली आहे.
संतोष पवार असे या दिव्यांगाचे नाव आहे. त्याच्या डाव्या पायाला ४७ टक्के अपंगत्व आहे. गेल्या सहा महिन्यांपासून रिक्षा चालविण्यासाठी लायसन्स मिळविण्यासाठी तो धडपडत आहे. त्याने आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी रिक्षा चालविण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु त्यासाठी त्यांच्याकडे लायसन्स नसल्याने त्याला रिक्षा चालवता येत नाही. त्याच्या केवळ डाव्या पायाला अपंगत्व आहे, मात्र रिक्षाचे ब्रेक उजव्या बाजूने असते. तसेच क्लच आणि गेअर हे देखील हाताने हाताळले जातात. त्यामुळे डाव्या पायाच्या अपंगत्वाने रिक्षा चालवण्यात कोणताही अडसर येत नसल्याचे तो सांगतो.
असे असूनही वेळोवेळी मोटार वाहन निरीक्षकांनी आधी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आणि नंतर घाटी रुग्णालयाचे प्रमाणपत्र आणण्यास सांगितले. हे प्रमाणपत्र देताना डॉक्टरांनी संतोषला रिक्षा चालवता येते किंवा नाही याची चाचणी घेतल्यानंतरच प्रमाणपत्र दिले; परंतु यानंतरही आरटीओ कार्यालयाचे निरीक्षक त्याच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास तयार नाही.
अधिकार्यांनी घेतली दखल
ही बाब सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांच्या निदर्शनास आली. तेव्हा त्यांनी सर्व बाजूंनी पडताळणी केली. तेव्हा संतोष पवार याना लायसन्स देण्यात कोणतीही अडचण नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी हरकत नाही असा शेरा मारला. तरीही निरीक्षक त्यांच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करत नसल्याने नकाते यांनी स्वत:च पवार यांची चाचणी घेऊन परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे.