ड्रेनेजच्या चेंबरमधून घुसविली पिण्याच्या पाण्याची लाईन, पाणी कसे मिळणार शुद्ध ?

By साहेबराव हिवराळे | Published: April 18, 2024 03:53 PM2024-04-18T15:53:42+5:302024-04-18T15:54:46+5:30

एक दिवस एक वसाहत: लायन्स क्लब कॉलनी, कासलीवाल पूर्व, दत्तनगर, सद्गुरू सोसायटी, शोभानगर, श्री गणेशा, रॉयल पार्क, विमान नगरात पाण्याचा प्रश्न गंभीर

Drinking water line penetrated through the drainage chamber, how to get clean water? | ड्रेनेजच्या चेंबरमधून घुसविली पिण्याच्या पाण्याची लाईन, पाणी कसे मिळणार शुद्ध ?

ड्रेनेजच्या चेंबरमधून घुसविली पिण्याच्या पाण्याची लाईन, पाणी कसे मिळणार शुद्ध ?

छत्रपती संभाजीनगर : ड्रेनेज चेंबरमधून पाण्याची लाईन घुसविली असल्याने सुरुवातीची दहा ते पंधरा मिनिटे पाणी वाया जाऊ द्यावे लागते. त्यानंतर पाणी भरावे लागते. जालना रोडलगत असलेला लायन्स क्लब कॉलनी, कासलीवाल पूर्व, दत्तनगर, सद्गुरू सोसायटी, शोभानगर, श्री गणेशा, रॉयल पार्क, विमाननगर परिसर गजबजलेला असला तरी येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.

कुठे रस्ते अपूर्ण तर कुठे पथदिव्यांची कमतरता आहे. परिसर जलदगतीने विस्तारत असून महानगरपालिकेकडे कर अदा करूनही सुविधा देण्याकडे कानाडोळा केला जात आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी लोकप्रतिनिधीने दिलेले हातपंप किरकोळ दुरुस्तीअभावी बंद आहेत. घंटागाडी चालकाने दांडी मारल्यास प्रवेशद्वारावरच दुर्गंधीचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागतो. कारण तेथे कचरा जमा केलेला असतो. ड्रेनेेजच्या जुन्याच लाईन असल्याने चोकअप होण्याचे प्रकारही वाढलेले आहेत. जालना रोड ओलांडून जाताना किंवा मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना धोका असून लोखंडी जाळ्यांमुळे वाहनाचा अंदाज येत नाही, तेव्हा रस्ता ओलांडणे धोकादायक ठरते.

रेशन दुकान हवे
रेशन दुकान नसल्याने चिकलठाणा गावात जावे लागते. चिकलठाणा येथे रेशन दुकानात जाऊन शासकीय योजनेचा लाभ घ्यावा लागतो. अनेकदा उशीर झाल्यास तो मिळत नाही. शासनाने या परिसरासाठी नवीन दुकान दिले पाहिजे.
- शेख मतीन, रहिवासी

आरोग्याची समस्या
घाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. याविषयी मनपा आयुक्तांकडे अनेकदा तक्रारी करूनही काम मार्गी लागले नाही. त्वरित पाणी व ड्रेनेजलाईन वेगळी करावी. लायन्स क्लब कॉलनी, कासलीवाल पूर्व दत्तनगर, सद्गुरू सोसायटी श्री गणेशा रॉयल पार्क विमाननगरात दूषित पाण्याची समस्या सोडवावी.
- सुरेश पवार, रहिवासी

बालवाडी, अंगणवाडी हवी
मनपाने बालवाडी, अंगणवाडी व्यवस्था केलेली नाही. सर्वसामान्य नागरिकांना खासगी शाळा परवडत नाही. नाईलाजास्तव कामगार व मध्यमवर्गीयांना मुलांना लांबच्या शाळेत टाकावे लागते. दूरवर ने-आण करणे पालकांसाठी त्रासदायक ठरते.
- शेख कलीम, रहिवासी

एकाच खांबावरून जोडण्या किती?
शोभानगरातील नागरिकांना प्रशस्त रस्ता म्हाडापासून सुरू असला तरी इतरत्र रस्ता बंद करण्यात आला आहे. विजेचा एकच खांब असून स्थानिक नागरिकांना वीज जोडणी घेताना लाकडी खांबाचा टेकू द्यावा लागतो. सुरळीतपणे वीज मिळावी यासाठी तिन्ही गल्ल्यांत विजेचे खांब टाकून द्यावेत. नाईलाजाने एकाच खांबावरून धोकादायक जोडणी करावी लागते.
- संजय दुसाने, रहिवासी

Web Title: Drinking water line penetrated through the drainage chamber, how to get clean water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.