‘एनआयआरएफ’ मूल्यांकनात विद्यापीठ ६९ व्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 19:12 IST2020-06-12T19:01:48+5:302020-06-12T19:12:51+5:30
विद्यापीठाने एनआयआरएफच्या मूल्यांकनात झेप घेतली असली तरी संशोधनात प्रगती करण्यास मोठी संधी असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.

‘एनआयआरएफ’ मूल्यांकनात विद्यापीठ ६९ व्या स्थानी
औरंगाबाद : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केलेल्या मूल्यांकनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने गतवर्षीच्या विद्यापीठ गटातील ८५ वरून ६९ व्या स्थानी मजल मारली आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात पुणे, मुंबईनंतर तिसरा क्रमांक पटकावला असल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी आॅनलाईन पत्रकार परिषदेत दिली.
नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क - २०२० (एनआयआरएफ) मूल्यांकन गुरुवारी जाहीर करण्यात आले. या यादीमध्ये विद्यापीठाच्या गटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने १६ स्थानांनी प्रगती केली आहे. विद्यापीठ गतवर्षी ८५ व्या स्थानावर होते. त्यास सुधारणा होऊन ६९ वे स्थान प्राप्त झाले आहे. या यादीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा क्रमांक ९ वा, तर मुंबई विद्यापीठाचा क्रमांक ६५ वा आहे.
राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांत पुणे, मुंबईनंतर औरंगाबादच्या विद्यापीठाचा क्रमांक लागत असल्याचेही कुलगुरू डॉ. येवले यांनी स्पष्ट केले. विद्यापीठाने केलेल्या प्रगतीचा फायदा विविध योजनांमधून संशोधन, पायाभूत सुविधांसाठी निधी मिळण्यासाठी होणार आहे. तसेच विद्यापीठातून पदवी घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या मानांकनाचा फायदा होईल, असेही कुलगुरूंनी स्पष्ट केले. आगामी वर्षात पहिल्या ५० विद्यापीठांमध्ये झेप घेण्याचा मानस असून, माझ्या उर्वरित चार वर्षांच्या काळात विद्यापीठ देशात पहिल्या २५ क्रमांकात असेल, असेही डॉ. येवले यांनी सांगितले.
...तर पीएच.डी.ची पदवी परत घेणार
विद्यापीठाने एनआयआरएफच्या मूल्यांकनात झेप घेतली असली तरी संशोधनात प्रगती करण्यास मोठी संधी असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. विद्यापीठाने अवॉर्ड केलेल्या संशोधनात कॉपी पेस्ट असेल, तर त्याची उचित चौकशी करून प्राधिकरणाच्या माध्यमातून संबंधित संशोधकांची पीएच.डी. पदवी परत घेण्याचा अधिकार विद्यापीठाला आहे.