ड्रेनेजलाईनवर मोबाईल कंपनीचे जाळे!
By Admin | Updated: December 4, 2014 00:26 IST2014-12-04T00:26:31+5:302014-12-04T00:26:31+5:30
औरंगाबाद : अवघे ४० कोटी रुपये देऊन संपूर्ण शहर खरेदी केल्याचा दावा करणाऱ्या एका मोबाईल कंपनीने जिकडे-तिकडे पब्लिक प्रॉपर्टीचा सत्यानाश सुरू केला आहे

ड्रेनेजलाईनवर मोबाईल कंपनीचे जाळे!
औरंगाबाद : अवघे ४० कोटी रुपये देऊन संपूर्ण शहर खरेदी केल्याचा दावा करणाऱ्या एका मोबाईल कंपनीने जिकडे-तिकडे पब्लिक प्रॉपर्टीचा सत्यानाश सुरू केला आहे. हे सर्व होत असताना मनपा प्रशासन मूग गिळून गप्प आहे. दोषी कंपनीवर कोणतीही कारवाई करण्याचे धाडस मनपा दाखवायला तयार नाही. क्रांतीचौकात तर कंपनीने हद्दच केली. चक्क ड्रेनेजलाईनवरच केबलचे जाळे पसरवून टाकले.
एका मोबाईल कंपनीने मनपाला ४० कोटी रुपये देऊन शहरात ठिकठिकाणी केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे. या कंपनीने आतापर्यंत महापालिकेच्या आणि सार्वजनिक पॉपर्टीवर घाला घालायला सुरुवात केली आहे. मनपाला पैसे दिल्याचे दाखवून कंपनी शहरात प्रत्येक रस्त्याच्या बाजूला केबल टाकत आहे.
क्रांतीचौकात तर कंपनीने ड्रेनेज लाईनवरच केबल टाकल्या आहेत. एका ठिकाणी तर ड्रेनेजच्या चेंबरवर कंपनीने आपले चेंबर बांधून टाकले. भविष्यात मनपाला ड्रेनेज लाईन किंवा चेंबर उघडायचे असल्यास कंपनीचे जाळे अगोदर बाजूला करावे लागेल. त्यानंतरच ड्रेनेज लाईनपर्यंत पोहोचता येईल.
सार्वजनिक चेंबरवर आपण कंपनीचे चेंबर उभारू नये एवढा साधा निकषही कंपनी पाळायला तयार नाही. क्रांतीचौक परिसरातील नागरिकांनी या प्रकाराला विरोध केला. नागरिकांचा विरोध झुगारून कंपनीने काम सुरूच ठेवले.