मतदारांच्या नावाचा 'डबलगेम'; छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन ‘अलर्ट मोड’वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 14:37 IST2025-10-28T14:36:39+5:302025-10-28T14:37:23+5:30
जिल्हाधिकारी : मतदार याद्यांसंदर्भातील आक्षेप, तक्रारींचे तत्काळ निराकरण करा

मतदारांच्या नावाचा 'डबलगेम'; छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन ‘अलर्ट मोड’वर
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात मतदारांचा (डबलनेम) दुबार मतदार नोंदणी संदर्भात आक्षेप येत असून, याबाबत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला गांभीर्याने चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तक्रारींमुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले असून, दुबार नावांसंदर्भात प्राथमिक चौकशी करावी. दुबार नावे एकाच व्यक्तीची आहेत, हे लक्षात आल्यानंतर तो मतदार एकच आहे, याबाबत खात्री करावी. एकापेक्षा जास्त प्रभागात एकाच मतदाराचे नाव आले असल्यास अशा मतदारांच्या नावांची यादी सूचना फलकावर, वेबसाईटवर प्रसिद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोमवारी बैठकीत दिले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ रोजी अंतिम केलेल्या मतदार याद्यांबाबत काही ठिकाणी आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यात दुबार नावे असणे, ही तक्रार प्रामुख्याने आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.
अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, डॉ. सुचिता शिंदे, एकनाथ बंगाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी ऑनलाइन बैठकीत सहभागी होते.
खात्री पटली तरच मतदानाची संधी
डबल नावे असलेले मतदार हे कोणत्या प्रभागात मतदान करणार आहेत, याबाबत लेखी अर्ज करण्याचे त्यांना आवाहन करावे. जे मतदार या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोणत्या प्रभागात मतदान करायचे आहे, हे कळवतील त्यानुसार अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादीत नोंद घ्यावी. मतदारांनी आवाहनास प्रतिसाद न दिल्यास मतदार यादीतील अशा सर्व नावांसमोर ‘दुबार नाव’ अशी नोंद करावी. असे मतदार मतदानासाठी आल्यास केंद्राध्यक्षांनी त्यांच्या ओळखपत्रावरून त्यांच्या खरेपणाविषयी खातरजमा करावी व खात्री पटल्यानंतरच मतदान करू द्यावे.
याद्या बिनचूक करा
प्रत्येक मतदार यादीची बूथनिहाय पडताळणी करावी. आपल्या मतदार याद्या या बिनचूक असतील, याबाबत खबरदारी घ्यावी. मतदार याद्यांसंदर्भात आलेल्या प्रत्येक तक्रारीचे निराकरण करा. तक्रारदारांच्या शंकांचे निरसन करा. मतदार याद्यांवर घेतलेल्या आक्षेपांबाबत निर्णय घ्या.
- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी