अंत बघू नका! जलवाहिनीचे काम लांबल्याने छ. संभाजीनगरातील 'N3,N4' चे रहिवासी मेटाकुटीला
By प्रशांत तेलवाडकर | Updated: January 30, 2026 20:09 IST2026-01-30T20:07:48+5:302026-01-30T20:09:01+5:30
२ महिन्यांपासून ई-७१ सेक्टर पासून ते किटली गार्डनकडे जाणारा सिमेंटचा रस्ता खोदून ठेवला आहे.

अंत बघू नका! जलवाहिनीचे काम लांबल्याने छ. संभाजीनगरातील 'N3,N4' चे रहिवासी मेटाकुटीला
छत्रपती संभाजीनगर : सिडकोतील एन-३ एन-४ परिसरातील अंतर्गत मुख्य रस्त्यावर सुरू असलेले जलवाहिनी टाकण्याचे काम नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मुख्य रस्ता तब्बल दोन महिन्यांपासून खोदून ठेवण्यात आल्याने अपघातांची मालिका सुरूच असून, नागरिकांच्या संयमाचा बांध आता तुटू लागला आहे. व्यवसायाला टाळे लावण्याची वेळ आली, आता अंत बघू नका, काम लवकर आवरा, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
एन-३ व एन-४ या दोघांच्या सीमेवरील मार्ग अशी ओळख असलेला रस्ता एन २ कामगार चौक ते उच्च न्यायालयापर्यंत जाणारा आणि उत्तर व दक्षिण भागाला जुळणारा अत्यंत वर्दळीचा मार्ग. २ महिन्यांपासून ई-७१ सेक्टर पासून ते किटली गार्डनकडे जाणारा सिमेंटचा रस्ता खोदून ठेवला आहे.
सध्या काय परिस्थिती?
१० फुटांपर्यंत खोदकाम करून मोठी जलवाहिनी टाकण्यात आली. पण, तेथील हायहोल्टेज लाइन, दोन लहान जलवाहिन्या उघड्या पडल्या आहेत. खोदकामात ड्रेनेजलाइन फुटल्याने खड्ड्यात दुर्गंधीयुक्त पाणी साठले आहे. एन ३ येथील किटली गार्डन परिसरातील पाण्याच्या टाकीपर्यंत मोठी पाइपलाइन नेण्याचे काम बाकी आहे. जलवाहिनीसाठी आणखी ५ फूट खोल खड्डा खोदायचा आहे. मात्र, रस्त्यात खूप अडथळे आहेत. अनेक एजन्सी या कामात असून त्यांच्यात ताळमेळ नसल्याने काम बंद पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
७० टक्के व्यवसाय घटला
रस्ता खोदल्यापासून ग्राहकांची वर्दळ प्रचंड घटली आहे. महिनाभरापासून उलाढालीत तब्बल ७० टक्क्यांनी घट झाली आहे. दुकान उघडून बसायचे की बंद ठेवायचे, असा प्रश्न पडला आहे.
संतोष मोदाणी,व्यापारी
नागरिकांचा संयम संपतोय
पिण्यासाठी पाणी पाहिजेच, पण महिनोनमहिने विकासाच्या नावाखाली नुकते खड्डे खोदून ठेवलेत. या रस्त्यावरील दुकानांचा व्यवसाय उद्ध्वस्त केला जात आहे.
गायत्री सोनवणे, औषधी व्यावसायिक
काम कधी पूर्ण होणार, हे जाहीर करा
एकीकडे रस्ता खोदला, दुसरीकडे काम बंद आहे. हायहोल्टेज लाइन उघडी पडली आहे. रोज दोन ते तीन वेळा वीज जात आहे. काम कधी पूर्ण होणार, हे प्रशासनाने जाहीर करावे.
दत्तात्रय तनपुरे, रहिवासी
दररोज घडताहेत अपघात
कामगार चौकाकडून वीर हनुमान मंदिर कमानीसमोरील मुख्य रस्त्यावर वाहने येतात, तिथे काम चालू असल्याचे लक्षात येते आणि उत्तरेकडील बाजूस छोट्या गल्लीतून वळण घ्यावे लागते. वाहनधारक गोंधळून जातात व तिथेच रोज अपघात होताहेत. एका वकिलाची गाडी याच ठिकाणी तीन ते चार दिवस फसली होती.
राहुल मार्गे, व्यावसायिक