करमाड ( छत्रपती संभाजीनगर) : घरगुती वाद विकोपाला जाऊन छोट्या भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना कुंभेफळ ( तालुका छत्रपती संभाजीनगर ) येथे गुरुवारी रात्री घडली. सुनील भाऊसाहेब पवार (३४) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली.
सुनील भाऊसाहेब पवार आणि राजू भाऊसाहेब पवार (३०) हे दोघे भाऊ कुंबेफळ येथे राहत. दोघे सख्खे भाऊ मजुरीचे काम करूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह करत. मात्र, अचानक त्यांच्यात कौटुंबिक वादाने कटुता आली. गुरुवारी रात्री वाद विकोपाला जाऊन राजू याने मोठा भाऊ सुनील याचा खून केला. माहिती मिळताच करमाड पोलिस ठाण्याचे फौजदार प्रताप नवघरे हे आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी राजू पवार याला कुंभेफळ परिसरातून ताब्यात घेतले. नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करमाड पोलीस ठाण्यात सुरू आहे.