सूर्य तळपताना भेदभाव करतो का? जायकवाडी पाणीकपातीवर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:19 IST2025-01-31T16:18:48+5:302025-01-31T16:19:17+5:30

जायकवाडी प्रकल्पाचा जलसाठा आता ६५ ऐवजी ५८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची शिफारस ‘मेरी’ समितीने शासनाकडे केली आहे.

Does the sun discriminate when it shines? All-party representatives to meet the Chief Minister on Jayakwadi water cut | सूर्य तळपताना भेदभाव करतो का? जायकवाडी पाणीकपातीवर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना भेटणार

सूर्य तळपताना भेदभाव करतो का? जायकवाडी पाणीकपातीवर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना भेटणार

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडीतील जलसाठ्याच्या निकषात बदल करून ७ टक्के पाणीकपातीच्या विरोधात जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटेल, अशी माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी गुरुवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

पालकमंत्री शिरसाट म्हणाले, ‘मेरी’ने (महाराष्ट्र इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) ज्या पद्धतीने जायकवाडीतील बाष्पीभवनाची प्रक्रिया जास्त असण्यापेक्षा कमी केली आहे. अहवालात कमी बाष्पीभवन होत असल्याचे नमूद केले आहे. कमी बाष्प होत असल्यामुळे पाणीबचत होते, असे ‘मेरी’ला दाखवायचे आहे. जेणेकरून वरच्या धरणातून पाणी सोडावे लागणार नाही. कालव्याची गळती व बाष्पीभवनाच्या आकड्यांचा खेळ करून मराठवाड्याचे पाणी कमी करण्याचा डाव आखला आहे काय? यावर पालकमंत्री म्हणाले, त्यांनी कसाही डाव आखला असेल तरी तो हाणून पाडण्यात येईल.

जायकवाडी प्रकल्पाचा जलसाठा आता ६५ ऐवजी ५८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची शिफारस ‘मेरी’ समितीने शासनाकडे केली आहे. याचा फायदा नाशिक व अहिल्यानगरला होणार असून, मराठवाड्याच्या वाट्याचे ७ टक्के पाणी पळविण्याचा हा प्रयत्न आहे. न्यायालयाने मेंढेगिरी समितीच्या अहवालाचे पुनर्विलोकन करण्यासाठी अभ्यासगटाला दीड महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगितले होते. ‘मेरी’चे महासंचालक प्रमोद मांदाडे यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांच्या अभ्यासगटाने समन्यायी पाणीवाटपाबाबत अभ्यास करून ऑक्टोबर २०२४ मध्ये अहवाल सादर केला. त्यात जायकवाडी धरणात पावसाळ्यानंतर पाणी सोडण्याच्या निकषात बदल करीत ६५ वरून ५८ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा ठेवण्याची शिफारस केली.

सूर्य तळपताना भेदभाव करतो का?
मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार, २३.५ टीएमसी बाष्पीभवन होत असल्याचे नमूद होते. आता ‘मेरी’च्या सात सदस्यीय अभ्यास गटाने ११.५ टीएमसी एवढेच बाष्पीभवन होत असल्याचा अहवाल दिला. त्यामुळे जायकवाडीतील पाण्याची बचत होते. परिणामी, वरच्या धरणातून जायकवाडीतून पाणी सोडण्याची गरज राहणार नाही. उन्हाळ्यात सूर्य तळपताना मराठवाड्यात कमी तळपायचे आणि इतर भागात जास्त तळपायचे असा भेदभाव करतो की काय, असा सवाल यानिमित्ताने बैठकीत चर्चिला गेला. दरम्यान, खा. संदीपान भुमरे म्हणाले, जायकवाडीच्या पाणीवाटपाबाबत ‘मेरी’ने दिलेल्या अहवालाचा आजच्या बैठकीत विरोध करण्यात आला.

Web Title: Does the sun discriminate when it shines? All-party representatives to meet the Chief Minister on Jayakwadi water cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.