डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न फळाला आले; ९७ वर्षांच्या आजींची, ९ महिन्यांच्या शिशुची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 12:31 IST2021-04-07T12:25:44+5:302021-04-07T12:31:10+5:30
वेळीच उपचारासाठी दाखल झाल्यास ज्येष्ठांना कोणताही धोका नसल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न फळाला आले; ९७ वर्षांच्या आजींची, ९ महिन्यांच्या शिशुची कोरोनावर मात
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांपाठोपाठ लहान मुलांना कोरोनाचा धोका वाढत असल्याचे चित्र काही दिवसांत पाहायला मिळाले. पण, घाटीत ९७ वर्षांच्या आजींनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. त्याबरोबर व्हेंटिलेटरवरील अवघ्या ९ महिन्यांच्या शिशूनेही कोरोनावर विजय मिळविला. वेळीच उपचार आणि डाॅक्टांचे शर्थींचे प्रयत्न, यामुळे या दोघांची कोरोनाविरुद्धची झुंज यशस्वी झाली.
२१ दिवसांचा आजींचा लढा यशस्वी
माळीवाडा येथील ९७ वर्षीय आजींना कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी १५ मार्च रोजी घाटीतील सुपर स्पेशालिटी ब्लाॅक (एस. एस. बी.) इमारतीतील वार्ड-३४ मध्ये दाखल करण्यात आले. तब्बल २१ दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यासाठी डाॅक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर या आजींनी कोरोनावर मात केली. कोरोनाविरुद्धचा आजींचा लढा यशस्वी ठरला. त्यांना ५ एप्रिल रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सुपर स्पेशालिटी ब्लाॅक (एस. एस. बी.) इमारतीतील वार्ड-३४ च्या प्रमुख आणि वार्धक्यशास्त्र विभागाच्या असोसिएट प्रोफेसर डाॅ. शैलजा राव, डाॅ. गणेश सोनवणे, डाॅ. मनोज मोरे, निवासी डाॅक्टर डाॅ. आशिष राजन, डाॅ. महेश पाटील, डाॅ. झेबा फिरदोस, डाॅ. श्रुती कर्णिक, डाॅ. साधना जायभाये, डाॅ. पंकज महाजन, डाॅ. मिलिंद खाडे, डाॅ. केहकाशा फारुकी, डाॅ. आयशा मोमीन हे सर्व मे २०२० पासून मेडिसीन विभागाच्या आयसीयू, एमआयसीयू, अन्य वार्ड, ‘एसएसबी’ येथे अहोरात्र रुग्णसेवा देत आहेत.
कोअर विभाग
घाटीतील वार्धक्यशास्त्र विभाग हा मेडिसीन विभागापाठोपाठ कोअर विभाग आहे. केवळ ज्येष्ठच नाही तर सर्व वयाच्या रुग्णांवर या विभागाचे डाॅक्टर उपचार करीत आहेत. वेळीच उपचारासाठी दाखल झाल्यास ज्येष्ठांना कोणताही धोका नसल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
खासगीने केले रेफर, शिशूला घाटीने केले बरे
जालना जिल्ह्यातील जामखेड येथील अवघ्या ९ महिन्यांच्या शिशूला कोरोनाची बाधा झाली. घरात कोणालाही कोरोनाचे निदान झाले नाही. पण शिशूला कोरोनाने गाठले. प्रकृती गंभीर झाली. खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे २ दिवस व्हेंटिलेटरवर होते. अखेर खासगी रुग्णालयाने शिशूला घाटीत रेफर केले. घाटीत येताच शिशू व्हेंटिलेटरवर असल्याने उपचाराचे आव्हान होते. घाटीत ३ दिवस व्हेंटिलेटर राहिल्यानंतर शिशूच्या प्रकृतीत सुधारणा झाली. ७ दिवस आयसीयूत राहिल्यानंतर बाळाने कोरोनावर मात केली. बाळ लवकर दाखल झाल्यानेच हे शक्य झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. उपचारासाठी बालरोग विभागप्रमुख डाॅ. प्रभा खैरे, डाॅ स्मिता मुंदडा, डाॅ. अमोल सूर्यवंशी, डाॅ. सतीश कुमार बी. एस. , डाॅ. अनिकेत सरवदे, डाॅ. नीला जोशी, डाॅ. नीलेश हातझाडे, डाॅ. अमित पाटील, डाॅ. उमेश नेतम, डाॅ. अंजू अशोकान, डाॅ. मंजुनाथ यू. आदींनी प्रयत्न केले.