कार रोलरला धडकून डॉक्टर गंभीर जखमी
By राम शिनगारे | Updated: April 23, 2023 19:50 IST2023-04-23T19:50:25+5:302023-04-23T19:50:32+5:30
सिडको उड्डाणपुलाजवळील अपघात : रोलर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल

कार रोलरला धडकून डॉक्टर गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर : भरधाव वेगाने जाणारी कार राँगसाईडने आलेल्या रोडरोलरला धडकून भिषण अपघात झाला. या अपघातात फुलंब्री येथील उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टर गंभीर जखमी झाले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात २२ एप्रिल रोजी रोलर चालकाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
डॉ.शैलेंद्र प्रकाश बाधले (रा.अलोकनगर, सातारा-देवळाई परिसर) असे गंभीर जखमी डॉक्टरचे नाव आहे. डॉ. शैलेंद्र बाधले हे फुलंब्री येथील उपजिल्हा रूग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. २० एप्रिल रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास फुलंब्री येथील कामकाज संपल्यावर डॉ. बाधले हे आपल्या कारने (एमएच २० ईई ९८५१) जालना रोडवरून घराकडे जात होते.
मुकुंदवाडी चौकातून सेव्हनहिलकडे जात असतांना सिडको उड्डाणपुलाजवळ समोरून राँगसाईडने आलेल्या रोड रोलरला डॉ. बाधले यांची कार धडकली. या अपघातात कार चक्काचूर झाली. डॉ. बाधले हे गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या डॉ.बाधले यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.