भरता की नाही टॅक्स ? नाव घेऊन पुकारा, थकबाकीदारांच्या घरासमोर हलगीवादन !
By मुजीब देवणीकर | Updated: February 14, 2024 19:51 IST2024-02-14T19:50:55+5:302024-02-14T19:51:41+5:30
मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मिटमिटा भागात मनपा कर्मचाऱ्यांनी थकबाकीदारांच्या घरासमोर हलगी वाजविली.

भरता की नाही टॅक्स ? नाव घेऊन पुकारा, थकबाकीदारांच्या घरासमोर हलगीवादन !
छत्रपती संभाजीनगर : मालमत्ता कर, पाणीपट्टीची वसुली जास्तीत जास्त व्हावी यासाठी मनपा प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. मंगळवारी झोन क्रमांक १ मधील कर्मचाऱ्यांनी मिटमिटा, देवगिरी व्हॅली भागात थकबाकीदारांच्या घरासमोर हलगी वाजविली.
चार लाख ४८ हजार रुपयांच्या वसुलीसाठी हलगी वाजविल्यानंतर फक्त १ लाख ५० हजार रुपये वसूल झाले. दरवर्षी मनपा प्रशासन जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत वसुलीवर विशेष लक्ष देते. यंदा तर मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी नोटिसासुद्धा देण्यात आल्या आहेत. जप्त मालमत्तांचा लिलाव करून मनपा मालमत्ता कराच्या थकबाकीची रक्कम काढून घेईल. उर्वरित रक्कम संबंधित मालमत्ताधारकाला परत दिली जाणार असल्याचे यापूर्वी प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले आहे.
वसुलीसाठी पाहिजे तसा प्रतिसाद मिळायला तयार नाही. त्यामुळे वॉर्ड कार्यालयांनी विविध उपाययोजना सुरू केल्या. झोन क्रमांक १ मधील अधिकारी संजय सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली टास्क फोर्सचे अविनाश मद्दी, अमित रगडे, अश्फाक सिद्दिकी, विजय भालेराव यांनी देवगिरी व्हॅली, मिटमिटा येथील मालमत्ताधारकांच्या घरासमोर त्याचे नाव घेऊन हलगी वाजविण्यास सुरुवात केली. तीन मालमत्ताधारकांकडून ४ लाख ४८ हजार रुपये अपेक्षित होते. त्यांनी १ लाख ५० हजार रुपये भरले.