तहानली धरणी, व्याकुळले राऩ़़ नको करु रे दैना, दे पावसाचं दान
By Admin | Updated: July 6, 2014 00:22 IST2014-07-06T00:06:32+5:302014-07-06T00:22:05+5:30
बीड: जून उलटला, जुलैचा पहिला आठवडा सरत आला तरीही पाऊस काही बरसलाच नाही़ २०१२ मध्ये दुष्काळ, २०१३ मध्ये गारपीट अन् आता पुन्हा एकदा दुष्काऴ़़

तहानली धरणी, व्याकुळले राऩ़़ नको करु रे दैना, दे पावसाचं दान
बीड: जून उलटला, जुलैचा पहिला आठवडा सरत आला तरीही पाऊस काही बरसलाच नाही़ २०१२ मध्ये दुष्काळ, २०१३ मध्ये गारपीट अन् आता पुन्हा एकदा दुष्काऴ़़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या साऱ्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले आहे़ जुलैच्या पहिल्या आठवड्यातच टँकरसंख्या २०० वर पोहोचली आहे़ आणखी काही दिवस पाऊस आला नाही तर स्थिती काय असेल? याचा विचारच न केलेला बरा़ जिल्ह्यात केवळ दोन टक्के पेरणी झाली; पण पाऊस नसल्याने हा पेराही धोक्यात आहे़ एकूण जलाशयातील पाणीसाठा अवघा ७ टक्के इतका आहे़ अनेक शहरांमध्ये पाण्यासाठी पंधरा दिवस ‘वेटींग’ करावी लागते़ पावसाअभावी साडेआठ लाखांहून अधिक पशुधनांच्या जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे़ सारेच व्यवहार थंडावले आहेत़ दुष्काळाचे ढग दाटून आल्याने बळीराजा धास्तावला आहे़ आता आषाढी एकादशीचीच काय ती आशा आहे़ ‘तहानली धरणी, व्याकुळले राऩ़़नको करु रे दैना, दे पावसाचं दाऩ़़’ अशी आर्त हाक शेतकरी देत आहेत़ या हाकेला वरुणराजा प्रतिसाद देईल़़़? दुष्काळाच्या तोंडावर जिल्ह्याच्या एकं दर स्थितीचा घेतलेला हा आढावा़़़
जित्राब जगवायचे कसे ?
संजय तिपाले ल्ल बीड
पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण होऊ लागली आहे. सुमारे साडेआठ लाख गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून सध्या महिनाभर पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे. त्यामुळे जित्राब जगवायचे कसे? असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे.
गतवर्षी रबी हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. त्यामुळे हाताशी आलेलली पिके उद्ध्वस्त झाली. याचा फटका ज्वारीच्या कडब्यालाही बसला. आहे तो कडबा शेतकऱ्यांनी गुरांसाठी गोळा करुन गंजी लावल्या; पण जुलै उजाडला तरीही पाऊस न झाल्याने कडब्याचे मोल वाढले आहे. गत महिन्यापर्यंत कडब्यांचे भाव शेकडा १२०० ते १४०० रुपये इतके होते. पाऊस नसल्याने कडबा कडाडला आहे. भाव अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. चाऱ्यासोबतच पाण्याचा प्रश्नही बिकट बनला आहे.
उसावरच मदार
या महिन्यातही पाऊस आला नाही तर आॅगस्ट महिन्यात चाऱ्याची टंचाई भेडसावू शकते. जिल्ह्यात ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस उभा आहे. हा ऊस कारखान्यांना न देता तो गुरांना चारा म्हणून देण्याच्या उपाययोजना करण्यात येतील, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी. बी. मोरे म्हणाले.
चारा छावणीवर नको दावणीवरच द्या, अशी मागणी भाजपचे भाई गंगाभिषण थावरे यांनी केली आहे. छावणीवर भ्रष्टाचार होतो, असे ते म्हणाले.
७१हजार ४१३ मे. टन चारा वैरण विकास पडीक जमिनीतून गतवर्षी उपलब्ध झाला होता.
०७लाख ४६ हजार ९०० मे. टन चाऱ्याचे उत्पन्न जिल्ह्यात दरवर्षी होते. यावर्षी पावसाभावी अद्याप उत्पन्न नाही
१५हजार मे. टन इतका चारा प्रत्येक महिन्याला लागतो. जिल्ह्यात साडेआठ लाखांहून अधिक गुरे आहेत.
धरण उशाला अन् कोरड घशाला!
पुरुषोत्तम करवा ल्ल माजलगाव
माजलगाव येथील धरणातून परळी येथील विद्यूत केंद्र व बीड शहराला पाणी पुरविले जाते़ धरण असूनही माजलगावात पंधरा दिवसाआड पाणी मिळते़ दरम्यान, दुष्काळी स्थितीने शेतकरी हैराण झाले असून ८० हजार पैकी केवळ ६५० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत़
माजलगाव येथील जायकवाडी धरणात आता केवळ साडेतीन टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे़ त्यामुळे आता येत्या काही दिवसांत पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ माजलगाव धरणासाठी २२ गावांना विस्थापित व्हावे लागले; पण या गावांनाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ धरणातील पाणी तूर्त फक्त पिण्यासाठी आरक्षित केले आहे़ शहराला तर सर्वाधिक पाणीटंचाई भासत आहे़ पंधरा दिवसाला एकदा पाणी येते़ त्यामुळे पाणी भरण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी होते़
दरम्यान, पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडू लागली आहे़ गावागावातील व्यवहार थांबले असून महागामोलाचे बियाणे, खत घरातच पडून आहे़ कृषी व्यापारपेठेतील खरेदी- विक्र ी व्यवहारावरही परिणाम झाला आहे़ शेतकऱ्यांत उत्साह नसल्याने व्यापाऱ्यांची चिंताही वाढली आहे़ रोज आकाशात ढगांची गर्दी होते, वारे सुटते; पण पाऊस काही येतच नाही़ शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत़
केवळ ४ टक्के पाणी
दिनेश गुळवे ल्ल बीड
जिल्ह्यातील माजलगाव व मांजरा या मुख्य मध्यम प्रकल्पांनी तळ गाठला आहे, तर लहान-मोठे ५० पेक्षा अधिक प्रकल्प कोरडे पडले आहे. आज घडीला जिल्ह्यात केवळ ४ टक्केच पाणीसाठा असल्याने नागरिकांचा जीव कासावीस होऊ लागला आहे. यामुळे पाणीटंचाईने व्याकूळ झालेले ग्रामस्थ ‘कमरेचे हात ढगाला लावू तू, भिजव पांडुरंगा माझा गाव तू’ अशी आर्त साद घालीत आहेत.
बीड जिल्ह्यात मोठे प्रकल्प दोन, मध्याम दहा तर लहान प्रकल्प १२९ आहेत. यातील बहुतांश प्रकल्पाचा पाणीसाठा ज्योत्याखाली आहे. माजलगाव व मांजरा या प्रकल्पावर सिंचनही मोठ्या प्रमाणावर होते. या दोन्ही धरणातील पाणीपातळी तळाला गेल्याने या परिसरातील ऊस, भाजीपाला यासह फळबागाही धोक्यात आल्या आहेत.
बीड विभागातील बिंदुसरा (०.८६०), सिंदफणा, बेलपारा या मध्यम प्रकल्पाने तळ गाठला आहे, तर महासांगवी प्रकल्पात १.५५ दलघमी पाणीसाठा आहे. तर, कटवट, ईट, बेलोरा, सज्जतपूर, सुलतानपूर, डोकेवाडी, मस्सावाडी, जुजगव्हाण, गोलंग्री, वाणगाव आदी २९ तलावांमध्ये ठणठणाट आहे. आष्टी तालुक्यातील मेहकरी, कडा, कडी, रुटी, तलवार, कांबळी या सहा मध्यम प्रकल्पासह १७ लघु प्रकल्पांमध्येही ठणठणाट आहे.
सध्या जिल्ह्यातील प्रकल्पात ४ टक्के पाणीसाठा आहे. तो पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. शिल्लक असलेला पाणीसाठाही अत्यल्प असल्याने अगामी काळात मोठे जलसंकट येऊ शकते, अशी भीती जलतज्ज्ञांतून व्यक्त होत आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी सध्या प्रशासनालाही मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.
आष्टी, पाटोद्यात पाण्याचा धंदा !
नितीन कांबळे/विलास भोसले ल्ल कडा/ पाटोदा
कायम दुष्काळी तालुका म्हणून आष्टी, पाटोद्याकडे पाहिले जाते. या तालुक्यांत पाणी चांगलेच भाव खाऊ लागले आहे. पाच रुपयांना एक हंडा पाणी विकत घ्यावे लागते. काहींनी पाण्याचा धंदाच सुरू केला आहे.
आष्टी तालुक्यातील ८१ गावे व ११७ वाड्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. रूटी या तलावातून एकेकाळी अर्ध्या तालुक्याला पाणी मिळायचे पण हा तलाव कोरडाठाक पडला आहे. त्यामुळे पाण्याची स्थिती बिकट बनली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड निराशा आहे.
पाटोद्यातही याहून वेगळी स्थिती नाही. अधिकारी, कर्मचारी बदल्यांच्या प्रक्रियेत व्यस्त आहेत. उपविभागीय अधिकारी राजेंद्र वाघ, तहसीलदार दिनेश झांपले यांच्या बदल्या व त्यानंतर स्थगिती यात महिन्याचा कालावधी गेला. गटविकास अधिकारी सूर्वे निवृत्त झाले. त्यानंतर गटविकास अधिकारी आले नाहीत. तालुका कृषी अधिकारी महिन्यापासून रजेवर आहेत. वीज वितरणचे अभियंताही प्रभारी आहेत. प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरत असल्यामुळे दुष्काळाचा मुकाबला करणार कसा? हा प्रश्न आहे.
परळीची बाजारपेठ थंडावली
संजय खाकरे ल्ल परळी
एकामागून एक अशी संकटांची मालिका शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही़ यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरीप हंगामाची तयारी केली; पण पाऊस रुसल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवरही झाला आहे़
तालुक्याचे खरीप क्षेत्र ४४ हजार ५६६ हेक्टर इतके आहे़ त्यापैकी केवळ ११ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत़़ शेतकरी चाड्यावर मूठ ठेवण्यासाठी आसुसला आहे; पण पाऊस रोज हुलकावणीच देतो आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांत निराशेचे वातावरण आहे़ पाऊस पडणार कधी? या विवंचनेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे़ पेरण्या खोळंबल्याने शेतकरी पुरते धास्तावले आहेत़ गारपिटीने तडाखा दिल्यावर पिकांबरोबरच शेतकऱ्यांचे संसारही मोडून पडले होते़ नुकसानीवर मात करुन शेतकरी खरिपासाठी सज्ज झाले होते; परंतु पावसाने लांबण टाकून शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे़ अर्धा हंगाम तर वाया गेलाच आहे़
आणखी पंधरा दिवसांत पाऊस आला नाही तर खरीप कोरडाच जाईल़ उशिरा पाऊस झाला तर पाणीटंचाई दूर होईल; पण खरीप हंगाम हाती लागणार नाही अशी भीती नागापूरचे शेतकरी मनोज एस्के यांनी व्यक्त केली़
औष्णिक विद्यूत केंद्रालाही झळ
परळी येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रालाही दुष्काळी परिस्थितीची झळ पोहोचू शकते़ सध्या या केंद्राला परभणी जिल्ह्यातील खडका धरणातून पाणी पुरविले जाते़ या धरणात माजलगाव धरणातून पाणी सोडलेले आहे़ मात्र, माजलगाव धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस खालावत आहे़ त्यामुळे महिन्यात पाऊस आला नाही तर विद्युत निर्मितीवरही परिणाम होईल़ त्यामुळे भारनियमनातही वाढ होऊ शकते़
केजमध्ये टँकर वाढले
मधुकर सिरसट ल्ल केज
दुष्काळ दारात येऊन ठेपल्याने तालुक्याच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ पेरण्या लांबल्याने शेतकरी चिंतातूर आहेत़ पाणीटंचाईची समस्या अधिकच तीव्र बनली असून अनेक गावांची मदार टँकरवर आहे़
सध्या तालुक्यातील १८ गावांसाठी २४ टँकर सुरु आहेत़ आणखी १० गावांचे प्रस्ताव तहसील कार्यालयात आले आहेत़ एकूरका, युसूफवडगाव, लासूरा, सासूरा, दहिफळ वडमाऊली, काळेगाव, सावळेश्वर, लाडेगाव, मुंडेवाडी, नायगाव, गोटेगाव, पाथ्रा येथे पाणीटंचाईच्या झळा अधिक आहेत़ पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे़ जुलै महिन्यात शेतशिवार हिरवेगार होतात; पण पावसाने दगा दिल्याने पेरण्या रखडल्या आहेत़
शहरात १५ दिवसाला येते पाणी
केज शहराला जाधवजवळा येथील धरणातून पाणी सोडले जाते़ मात्र, पंधरा दिवसाला एकदा पाणी भेटत असल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहे़ शहरात सध्या १० टँकर सुरु आहेत़ टँकरची मागणी वाढू लागली आहे़ येत्या काही दिवसांत टँकरसंख्येत आणखी भर पडणार आहे़
७० गावांत पाणीटंचाई
सखाराम शिंदे ल्ल गेवराई
तालुक्यात दुष्काळी झळा जाणवण्यास सुरुवात झाली असून सद्यस्थितीत ७० गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ पेरण्या रखडल्या आहेत, व्यवहार थंडावले आहेत, रोजगारही दुरापास्त झाला आहे़ दुष्काळाच्या स्थितीने सर्वांचे चेहरे चिंतातूर झाले असून आभाळाकडे लक्ष वेधले आहे़
१ लाख १० हजार इतके खरिपाचे क्षेत्र आहे, त्यापैकी फक्त १० हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत़ ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचे स्वत:चे स्त्रोत उपलब्ध आहेत
त्यांनी कापूस लागवड केली; परंतु पाऊस नसल्याने पातळी दिवसेंदिवस घटू लागली आहे़ परिणामी, पिके धोक्यात आहेत़ तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये पाण्याची समस्या गंभीर स्वरुप धारण करु लागली आहे़