चहा पिण्यासाठी जिल्ह्यात दररोज लागणार ५ हजार कुल्हड
By | Updated: December 3, 2020 04:09 IST2020-12-03T04:09:30+5:302020-12-03T04:09:30+5:30
औरंगाबाद : रेल्वेस्थानकावर यापुढे प्लास्टिक कपाऐवजी ''कुल्हड’मधून चहा मिळणार आहे. दररोज ५ हजारांच्या जवळपास कुल्हड लागतील. यामुळे पुन्हा रोजगार ...

चहा पिण्यासाठी जिल्ह्यात दररोज लागणार ५ हजार कुल्हड
औरंगाबाद : रेल्वेस्थानकावर यापुढे प्लास्टिक कपाऐवजी ''कुल्हड’मधून चहा मिळणार आहे. दररोज ५ हजारांच्या जवळपास कुल्हड लागतील. यामुळे पुन्हा रोजगार मिळण्याच्या स्थानिक कुंभार कारागिरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
प्लास्टिक मुक्त भारत हे केंद्र सरकारचे धोरण आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी देशातील सर्व रेल्वेस्थानके प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ‘कुल्हड’मधून चहा देण्याचा निर्णय घेतला. कुल्हड म्हणजे मातीचे बोळके (कप) होय. २००४ ते २००९ दरम्यान यूपीएच्या काळात लालू प्रसाद यादव केंद्रीय रेल्वेमंत्री होते. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा रेल्वेस्टेशनवर कुल्हडमधून चहा देण्याची अंमलबजावणी केली होती. मात्र, त्यांचे मंत्रीपद जाताच हा उपक्रम बंद पडला. पुन्हा प्लास्टिक कपातून चहा देण्यात येऊ लागला.
अनलॉकनंतर आता हळूहळू रेल्वेची संख्या वाढत आहे. सध्या रेल्वेस्थानकावरील हॉटेल बंद आहेत. फक्त पॅकिंगमधील पदार्थ विकले जात आहेत. चहा, कॉफी विकल्या जात नाही. लॉकडाऊन आधी औरंगाबाद रेल्वेस्थानकावर दररोज अडीच ते तीन हजार कप चहा विकला जात होता. अन्य स्थानकातील ८०० ते १००० कप म्हणजे दररोज ५ हजार कप चहा विकत असे. आता कुल्हडमधून चहा देण्यात येणार असल्याने कंत्राटदाराला शहरातील कुंभार व्यावसायिकांकडून कुल्हड खरेदी करावे लागेल.
चौकट
स्थानिक कुंभारांना मिळेल रोजगार
लालू प्रसाद यादवांच्या काळात स्थानिक व्यावसायिक दररोज अडीच ते तीन हजार कुल्हड रेल्वे स्टेशनवरील हॉटेलला पुरवत होते. कुल्हड वापरून फेकून दिले जातात. सध्या एक कुल्हड दीड ते अडीच रुपये दरम्यान मिळतो. यामुळे चहाचे दर वाढविण्याची शक्यता आहे.
---------
प्रतिक्रिया
अद्याप आदेश अप्राप्त
जालना ते वैजापुरात नोकरी करणारा नोकरदारवर्ग रेल्वेप्रवासात चहा जास्त पितो. रेल्वे प्रवासी कमी चहा पितात. प्रवासी संख्या कमी असल्याने सध्या चहा बंद आहे. अजून कुल्हडमधून चहा देण्याचे आदेश आम्हाला मिळाले नाही.
मजहर खान,
हॉटेल व्यावसायिक.
---
कुल्हड नाही परवडत
एक कुल्हड दीड ते अडीच रुपयांत मिळते. करारानुसार कंत्राटदारला कुल्हडमधून चहा देणे परवडत नाही. चहाचे दर वाढले तर कुल्हडमधून चहा देणे परवडेल.
अतीश विधाते,
चहा विक्रेता.
---