औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत ६५० पाण्याच्या टाक्यांचे वितरण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 23:51 IST2019-03-03T23:51:42+5:302019-03-03T23:51:53+5:30
टंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळे उपाय करण्यात येत असून, सीएसआर (कॉर्पाेरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी)अंतर्गत विभागातील औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात साठवण टाक्यांचे वितरण करण्यात येणार आहे.

औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत ६५० पाण्याच्या टाक्यांचे वितरण होणार
औरंगाबाद : मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. ११७६ गावे आणि ३७६ वाड्यांमध्ये १५३९ टँकरने पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी वेगवेगळे उपाय करण्यात येत असून, सीएसआर (कॉर्पाेरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी)अंतर्गत विभागातील औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात साठवण टाक्यांचे वितरण करण्यात येणार आहे. साठवण टाक्यांतून पिण्याचे पाणी वितरित करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला मंत्रालयातून देण्यात आल्या आहेत.
मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांसह नाशिक, अहमदनगर आणि बुलडाणा या जिल्ह्यांत १००० टाक्यांचे वितरण होणार आहे. सीएसआरअंतर्गत टंचाईग्रस्त गावांमध्ये प्लास्टिक/फायबरच्या पाणी साठवण टाक्यांमध्ये टँकरचे पाणी टाकण्यात येईल. साठवण टाकी ऊंच कठड्यावर बसविण्यात येईल. प्रत्येक टाकीसाठी २ ते ५ नळ जोडण्या करण्याबाबत शासनाने प्रशासनाला काही सूचना केल्या आहेत. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा या कंपनीने सीएसआरअंतर्गत १ हजार साठवण टाक्या पुरविण्याचे मान्य केले आहे. सदरील टाक्या तहसीलदार पातळीवर आवश्यक त्या ठिकाणी बसविण्यात येणार आहेत. औरंगाबादेतील एका कंपनीकडून सदरील टाक्या पुरविल्या जातील, असे शासनाने आदेशात म्हटले आहे.