शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या धनंजय मुंडेंना बडतर्फ करा: अंबादास दानवे
By बापू सोळुंके | Updated: February 4, 2025 18:47 IST2025-02-04T18:46:57+5:302025-02-04T18:47:49+5:30
मुंडेंचे एकानंतर एक भ्रष्टाचाराचे प्रकरणे समोर येत आहे, हे सरकार भ्रष्टाचाराला, गुन्हेगारांना प्रोत्साहन देणारे आहे.

शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या धनंजय मुंडेंना बडतर्फ करा: अंबादास दानवे
छत्रपती संभाजीनगर: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी नॅनो डीएपी, नॅनो युरीया आणि फवारणी पंप खरेदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. हा प्रकार म्हणजे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत भ्रष्ट मुंडेंना बडतर्फ करावे, मंत्र्यापासून ते सचिवापर्यंत सर्वांवर गुन्हे नोंदवावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.
आ. दानवे म्हणाले की, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषदेत पुराव्यानिशी धंनजय मुंडे यांनी नॅनो डिएपी, नॅनो युरीया तसेच फवारणी पंप खरेदीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. कृषी विभागाच्या तत्कालीन सचिवांनी डीबीटी बाहेर खरेदी करण्याची प्रक्रिया राबववून सरकारची आणि शासनाची फसवणूक केली आहे. यामुळे याप्रकरणात मंत्र्यापासून ते सचिवांपर्यंत सर्वांवर गुन्हे दाखल केले जावे,अशी आपली मागणी असल्याचे आ. दानवे म्हणाले. मुंडेंचे एकानंतर एक भ्रष्टाचाराचे प्रकरणे समोर येत आहे, असे असताना हे सरकार भ्रष्टाचाराला, गुन्हेगारांना प्रोत्साहन देणारे आहे. लाडक्या बहिणींचे कुंकू पूसणारे सरकार असल्याचा आरोप आ.दानवे यांनी केला. यामुळे सरकारने तातडीन मुंडेचा राजीनामा घ्यावा,अन्यथा आगामी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशाराही आ. दानवे यांनी दिला.
मुंडे, कराड एकाच नाण्याच्या दोन बाजू
संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात धनंजय मुंडेंवर खूनाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे, याकडे लक्ष वेधले असता आ. दानवे म्हणाले की, जरांगे यांची भूमिका योग्यच आहे. मुंडेच्या पाठिंब्यानेच कराड टोळीची मस्ती,दादागिरी बीडमध्ये वाढली आहे. कारण वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघेही एकाच न्यायाच्या दोन बाजू आहेत. पीक विमा घोटाळा, संतोष देशमुख हत्या आणि खंडणीचा प्रकार हा कोणाच्या आर्शिवार्दाशिवाय होऊच शकत नाही. कराड शिवाय मुंडेचे पानही हालत नाही.