स्तनाच्या कर्करोगावरील नवीन रासायनिक संयुगांचा शोध; छत्रपती संभाजीनगरच्या प्राध्यापकांना पेटंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 19:58 IST2025-08-30T19:56:36+5:302025-08-30T19:58:13+5:30
देवगिरी, स.भु. विज्ञान, शासकीय संस्थेतील प्राध्यापकांचे संशोधन

स्तनाच्या कर्करोगावरील नवीन रासायनिक संयुगांचा शोध; छत्रपती संभाजीनगरच्या प्राध्यापकांना पेटंट
छत्रपती संभाजीनगर : महाविद्यालयातील प्राध्यापकांनी स्तनाच्या कर्करोगावर नवीन रासायनिक संयुगांचा शोध लावला आहे. हे संशोधन स्तनाच्या कर्करोगाच्या चाचण्यांमध्ये यशस्वी ठरल्यामुळे केंद्र शासनाच्या पेटंट विभागाने या संशोधनास स्वामित्व हक्क (पेटंट) जाहीर केले आहेत.
संशोधकांमध्ये देवगिरी महाविद्यालयातील डॉ. दत्तात्रय पानसरे, स.भु. विज्ञानमधील डॉ. धनराज कांबळे, शासकीय न्यायसहायक विज्ञान संस्थेतील डॉ. देविदास भगत, डॉ. रोहिणी शेळके, डॉ. शैली तिवारी, डॉ. प्रथमेश देशपांडे, डॉ. अमित पुंड, डॉ. प्रवीण चव्हाण, डॉ. मुबारक शेख यांचा संशोधकांमध्ये समावेश आहे. संशोधनामध्ये संभाव्य स्तन कर्करोगविरोधी घटक म्हणून पर्यायी (झेड)-२-(४-नायट्रोबेंझिलिडीन)-५-(बेंझिल (फिनाइल) अमीनो) थायोफेन-२ (२ एच)-वन संयुगांच्या संश्लेषणासाठी पेटंट दिले आहे. पेटंट झालेली संयुगे हेटेरोसायक्लिक डेरिव्हेटिव्ह्जच्या वर्गाशी संबंधित आहेत, जे त्यांच्या व्यापक औषधीय गुणधर्मांसाठी ओळखले जातात. त्यात विशिष्ट संरचनात्मक बदल करून संशोधकांनी कर्करोगाच्या पेशींविरुद्ध संयुगांची क्रिया यशस्वीरीत्या वाढवली आहे. प्राथमिक तपासणीचे निकाल कर्करोगविरोधी क्षमता दर्शवितात. तसेच पुढील औषधीय मूल्यांकनांसाठी आणि औषध विकासासाठी मार्ग उघडतात. ही संयुगे कर्करोगविरोधी, विशेषतः स्तनाच्या कर्करोगाविरुद्ध, आशादायक क्रियाकलाप प्रदर्शित करतात, ज्यामुळे उपचारात्मक औषध शोध आणि कर्करोग उपचारांसाठी नाविन्यपूर्ण दृष्टिकोनांमध्ये लक्षणीय प्रगती दिसून येत असल्याचेही म्हटले आहे.
संस्थाचालकांकडून कौतुक
महाविद्यालयातील प्राध्यापकांनी केलेल्या या महत्त्वपूर्ण संशोधनास पेटंट जाहीर झाल्यामुळे देवगिरी महाविद्यालयाचे संस्थाचालक आ. सतीश चव्हाण, प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, स.भु. संस्थेचे अध्यक्ष ॲड. दिनेश वकील, सरचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे, प्राचार्य डॉ. सतीश पाटील यांच्यासह इतरांनी कौतुक केले आहे.