आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल दोन अब्ज रुपयांचा घोटाळा
By सुमित डोळे | Updated: July 12, 2023 20:23 IST2023-07-12T20:23:12+5:302023-07-12T20:23:21+5:30
अध्यक्ष अंबादास मानकापेंसह संचालक मंडळ, कर्जदारांवर गुन्हे दाखल

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल दोन अब्ज रुपयांचा घोटाळा
छत्रपती संभाजीनगर : नियमबाह्य कर्जवाटप करून ओळखीतल्याच लोकांना, स्वत:च्याच इतर संस्थांना कोट्यवधींच्या कर्जाची खैरात वाटल्याचा आदर्श नागरी सहकारी संस्थेमध्ये तब्बल २ अब्ज दोन कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. २०१६ ते २०२३ यादरम्यान झालेल्या उपनिबंधक कार्यालयाच्या लेखा परीक्षणात हा प्रकार सिद्ध झाला. सिडको पोलिस ठाण्यात मंगळवारी मुख्य संचालक अंबादास आबाजी मानकापेंसह अन्य मंडळ, कर्जदारांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. गेल्या दोन आठवड्यांपासून उपोषणाला बसलेल्या ठेवीदारांनी त्यानंतर सायंकाळी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
एप्रिल २०२३ मध्ये स्थापन झालेल्या आदर्श ग्रुप अंतर्गत आदर्श नागरी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. सहा महिन्यांपासून या पतसंस्थेतील गैरव्यवहारांविषयी चर्चा सुरू होत्या. अनेक ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली होती. सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशावरून विशेष लेखा परीक्षक धनंजय चव्हाण यांनी २०१६ ते २०१९ कालावधीतले लेखा परीक्षण केले. जून २०२३ मध्ये त्यांनी याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला. त्यामध्ये मानकापे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अनेक कारनामे समोर आले. कर्जासाठी आलेल्या अर्जांची योग्य छाननी करणे, निकषानुसार पात्र-अपात्र ठरवून संस्थेच्या संचालक मंडळाच्या सभेत विचार करून मंजुरीअंती कर्ज वितरण करणे बंधनकारक होते. मात्र आरोपींनी यातील एकही निकष न पाळता तब्बल २०२ कोटी रुपयांचा कर्जवाटपात गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाले.
यांच्यावर गुन्हे दाखल
दोन्ही गुन्हे मिळून अध्यक्ष अंबादास आबाजी मानकापे (एन-६), महेंद्र जगदीश देशमुख (महाजन कॉलनी), अशोक नारायण काकडे, काकासाहेब लिंबाजी काकडे (दोघेही वरझडी), भाऊसाहेब मल्हार मोगल (निलजगाव), त्र्यंबक शेषराव पठाडे (वरझडी), रामसिंग मानसिंग जाधव (गिरनेर तांडा), गणेश ताराचंद दौलतपुरे (चेतनानगर ), ललिता रमेश मून (एकोड पाचोड), सपना निर्मळ संजय (एन-३), प्रेमिला माणिकलाल जैस्वाल (आपतगाव), मुख्य व्यवस्थापक देवीदास सखाराम अधाने (रा. नवजीवन कॉलनी), पंडित बाजीराव कपटे (हडको) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.